• Mon. Nov 25th, 2024
    जेव्हा अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता!

    मुंबई : साल… १९७७.. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला… वसंतदादा गटाच्या कुरघोडीमुळे शंकररावांना खुर्ची खाली करावी लागली… या घटनेमुळे शंकरराव चव्हाण पुरते नाराज झाले अन् काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला… आता याच शंकररावांच्या लेकानेही (अशोक चव्हाण) काँग्रेसला रामराम केलाय.. पक्षात वापसी करून शंकररावांनी शेवटचा श्वास काँग्रेसमध्येच घेतला पण अशोकरावांनी आपल्या हातातील काँग्रेसचा झेंडा बाजूला ठेवलाय. चव्हाणांच्या दोन पिढ्यांचं काँग्रेसमधलं राजकारण कसं होतं, काँग्रेसने चव्हाणांच्या दोन पिढ्यांचं राजकारण कसं सेट केलं? याचीच ही स्टोरी….

    • १९७५ ला शंकरराव चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
    • शंकररावांच्या मंत्रिमंडळात वसंतदादा पाटील मंत्री होते
    • कालांतराने शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये मतभेद
    • शंकररावांनी वसंतदादांना मंत्रिमंडळातून वगळलं
    • या घटनेनंतर महाराष्ट्र काँग्रेस चव्हाण आणि पाटील गट विभागले
    • १९७७ ला शंकरराव चव्हाणांच्या जागी वसंतदादा पाटलांची निवड
    • नाराज झालेल्या शंकरराव चव्हाणांकडून महाराष्ट्र समाजवादी पक्षाची स्थापना

    महाराष्ट्र समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शंकररावांनी वेगळी चूल मांडली असताना शरद पवारांनी पुलोद प्रयोग घडवला. १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडताच शंकररावांनी पुलोदमध्ये सहभाग घेतला. मात्र, इंदिरा गांधींच्या सांगण्यावरुनच आपण पक्ष स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला. आणि दोनच वर्षात शंकररावांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यानंतरच अशोक चव्हाणांची राजकारणात एन्ट्री झाली.

    शंकररावांनी वेगळा पक्ष काढला, शरद पवारांना साथ दिली, आता अशोक चव्हाणांचीही काँग्रेसला सोडचिट्ठी

    • १९८० मध्ये इंदिरा काँग्रेसमध्ये वापसी करत शंकरराव चव्हाण काँग्रेसकडून लोकसभेत गेले
    • १९८४ मध्ये संरक्षण मंत्री पदावर वर्णी
    • १९८६ साली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री मिळताच शंकरराव केंद्रातून राज्यात परतले
    • तर अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेवर गेले
    • दोन वर्षे खासदार राहिल्यानंतर अशोक चव्हाणांनी खासदारीचा राजीनामा देत वडिलांसाठी जागा रिक्त केली
    • १९८९ नंतर शंकरराव चव्हाणांनी संसदीय राजकारणातून माघार घेतली
    • १९९० नंतर शंकररावांच्या मार्गदर्शनाखाली अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये स्थान बळकट केलं

    १९९२ मध्ये अशोक चव्हाण राज्यात मंत्री झाले आणि सत्तेच्या राजकारणात कायम टिकून राहिले. पुढे २००८ मध्ये अशोक चव्हाणही मुख्यमंत्री झाले.. अशा तऱ्हेने तीनवेळा काँग्रेसने चव्हाण कुटुंबाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, सत्तेत आणि संघटनेत राज्याचा कारभार करण्याची संधी मिळूनही अशोक चव्हाणांनी नवे राजकीय पर्याय चाचपण्यासाठी आता काँग्रेसची साथ सोडली. देशभरात विविध नेत काँग्रेस पक्षाची साथ सोडत असताना चव्हाणांच्या दोन पिढ्या गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहिल्या, अशी चर्चा होत असताना अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed