भारतीय जनता पक्षातर्फे सध्या ‘गाव चलो’ अभियान सुरू आहे. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी हे अभियान आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एक दिवस एका गावात मुक्काम करायचा आहे. नगर जिल्ह्यातही हे अभियान सुरू आहे. यासाठी डॉ. विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नगर तालुक्यातील वाळकी या गावाची निवड केली. रविवारी सकाळीच ते वाळकीत दाखल झाले. दिवसभर तेथे विविध कार्यक्रम असून रात्री मुक्काम होणार आहे. मधल्या काळात त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
इतर विषयांसोबत थोरात यांच्या वाढदिवसाच्या फलकाचाही उल्लेख निघाला. त्यावेळी खासदार विखे पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात हे फॅड आले आहे. कार्यकर्ते आजकाल भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी आमदार, भावी खासदार, भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री असे फलक लावतात. मात्र ज्या ज्या नेत्यांचे भावी म्हणून फलक लागतात, ते त्या पदावर पोहचू शकले नाहीत. हा माझा व्यक्तिगत राजकीय अनुभव आहे. आपल्याकडे ज्यांचे असे फलक लागले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला.
सरकारच्या कामगिरीवर सुजय विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारची एवढी छान कामगिरी पाहून सामान्य जनतेला २०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवे आहेत. त्यामुळे एनडीएला नक्कीच ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.