• Sat. Sep 21st, 2024
नाशिककरांची अपेक्षापूर्ती कधी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे पालकत्व घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी (दि. १०) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे लोकार्पण होणार आहे.

मात्र, नाशिकचे पालकत्व घेताना फडणवीसांनी केलेल्या घोषणांची पूर्तता होणार तरी कधी, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

आमदारांनी केलेल्या कामांचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते होणार असले, तरी फडणवीस यांनी नाशिककरांसाठी केलेल्या निओ मेट्रो, मलनिस्सारण प्रकल्पासोबतच, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्कचे काय झाले, असा सवाल नाशिककरांकडून केला जात आहे. त्यामुळे यापूर्वी नाशिककरांसाठी केलेल्या घोषणांनी फडणवीस आता तरी पूर्तता करतात का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनंत कान्हेरे मैदानावर घेतलेल्या सभेत नाशिकचे पालकत्व घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली होती. १२२ पैकी ६३ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून दिल्याने आता नाशिकचा विकास होईल, अशी नाशिककरांची अपेक्षा होती. फडणवीस यांनीही नाशिककरांची निराशा न करता नाशिकमध्ये टायरबेस्ड निओ मेट्रोची घोषणा केली होती. यासोबत नाशिकचे मलनिस्सारण प्रकल्प आणि पाणीपुरवठा योजनांसाठी तीनशे कोटी देण्याची घोषणा केली होती. नाशिकमधील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी नाशिकमध्ये आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क सुरू करण्याची घोषणा केली होती. फडणवीस यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचीही घोषणा केली होती. नाशिकच्या विकासासाठी भरीव निधीचीदेखील घोषणा केली. निओ मेट्रोसाठी केंद्र सरकारने २१०० कोटींची घोषणाही केलेली आहे. परंतु, अद्याप या प्रकल्पाची फाइल ‘पीएमओ’मध्येच मंजुरीसाठी प्रलंबित आहे. पाणीपुरवठा व मलनिस्सारणाचा निधीही कागदावरच आहे. मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या फडणवीसांकडून नाशिकसाठी यापूर्वी घोषित केलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेची अपेक्षा आहे.

सिंहस्थासाठी निधीची अपेक्षा

सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ होणार असून, या सिंहस्थाच्या नियोजनाला आतापासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांतर्गत रिंगरोड, वाहतूक आराखडा अशा महत्त्वाच्या बाबींची चर्चा सध्या कागदावरच आहे. महापालिकेने यंदा सिंहस्थासाठी जवळपास ११ हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हा निधी मिळाल्यास नाशिक शहराच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीसांकडून सिंहस्थनगरीला निधीची घोषणा होणे अपेक्षित आहे. यासोबतच निओ मेट्रो प्रकल्प आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक कॉरिडॉरची घोषणाही होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed