• Mon. Nov 25th, 2024

    गजानन काळे यांची पालिका अभियंता आणि कंत्राटदाराला शिवीगाळ अन् धमकी, मनसेविरोधात भूमिपुत्र आक्रमक

    गजानन काळे यांची पालिका अभियंता आणि कंत्राटदाराला शिवीगाळ अन् धमकी, मनसेविरोधात भूमिपुत्र आक्रमक

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: सीवूड्समध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी जाऊन मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून महापालिका अभियंता आणि संबंधित कंत्राटदाराला शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली. मात्र या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन भूमिपुत्र कंत्राटदारांनी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयावर धडक दिली आणि काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर गजानन काळे यांनी भूमिपुत्र कंत्राटदाराची माफी मागितल्यावर हे प्रकरण शांत झाले.

    नवी मुंबई मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सीवूड्मध्ये सुरू असलेल्या पालिकेच्या एका विकासकामाच्या ठिकाणी भेट दिली. हे काम योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट महापालिका अभियंता संजय पाटील आणि इतर महापालिका कर्मचारी यांना याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. याच वेळी कंत्राटदार कोण आहे, असे विचारत त्यांनी त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून शिवीगाळही केली आणि सर्वांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्याचीही भाषा केली. या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर गुरुवार सकाळपर्यंत व्हायरल झाला. त्यामुळे पालिका अभियंता, कर्मचाऱ्यांनी अशा वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. शिवाय, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र कंत्राटदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून मनसेच्या सीवूड्समधील मध्यवर्ती कार्यालयावर थेट धडक दिली. तसेच, गजानन काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू केली. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    जोपर्यंत काळे जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा ठाम निर्धार स्थानिक भूमिपत्रांसह स्थानिक कंत्राटदारांनी केला होता. यावेळी जमलेल्या भूमिपुत्रांकडून काळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा असा प्रकार घडल्यास प्रकल्पग्रस्त खपवून घेणार नाही, असा त्यांनी इशारा दिला. भूमिपुत्रांची आक्रमकता पाहून पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल, ही दादागिरी आम्ही टिकू देणार नाही. सर्व भूमिपुत्र आम्ही लढायला तयार आहोत, असा इशाराही भूमिपुत्रांच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गजानन काळे यांनी सर्वांची माफी मागितली.

    यापुढे असा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही गजानन काळे यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर जमलो होतो. भूमिपुत्रांना शिवीगाळ का केली? यापुढे असे प्रकार घडले तर आम्ही उलट उत्तर देऊ आणि कायदेशीर लढाई लढू. आमचा एल्गार जनतेला माहिती आहे.

    – अमित मढवी, करावे गाव

    स्थानिक आगरी कोळी समाजाच्या भावना दुखविण्याचा आमचा हेतू नव्हता. नवी मुंबईत महापालिकेची कंत्राटदारामार्फत कामे सुरू आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आलो होतो. माझ्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी आगरी कोळी समाज बांधवांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो.

    – गजानन काळे, मनसे शहर अध्यक्ष

    साईनाथ बाबर यांना दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून संकेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed