रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि २०२४ चे रायगडे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी रायगडमध्ये जाहीरपणे टीका करत त्यांना सुनावले आहे. सगळीच पद तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत? असा थेट सवालच त्यांनी केला आहे. खासदार सुनील तटकरे यांची आम्हाला महाराष्ट्रासाठी गरज आहे. त्यामुळे तटकरे यांनी आता रायगडमध्ये अडकून न पडता महाराष्ट्रात फिरावे, असे सांगत रायगड सांभाळण्यासाठी धैर्यशील पाटील आता समर्थ आहे, असं मोठे वक्तव्य अतुल काळसेकर यांनी केलं आहे. तसेच धैर्यशील पाटील हे रायगडचे पुढील खासदार असतील, असंही ते म्हणाले आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक गावात, लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. महाराष्ट्रात महायुतीचे ४५+ खासदार निवडून आणायचा असा प्रण त्यांनी केला आहे. या मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आम्हाला त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरज आहे. प्रत्येक मतदारसंघात जाऊन, महाराष्ट्रात जाऊन महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी तटकरे यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने तटकरेसाहेब या मतदारसंघात अडकून पडले आहेत.
माझी त्यांना सूचना आहे विनंती आहे की तटकरेसाहेब तुम्ही या मतदारसंघात अडकून पडू नका. हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी तुमच्या पुतण्या धैर्यशील दादा समर्थ आहे. सगळीच पदं तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी आहेत? असा थेट सवाल अतुल काळसेकर यांनी उपस्थित केला.
आपण या केलेल्या विनंतीनुसार सुनील तटकरे अवघ्या महाराष्ट्रात फिरतील आणि त्यामुळे या मतदारसंघात धैर्यशील दादांना ही संधी प्राप्त होईल. या रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पूर्णपणे भाजपाचं वर्चस्व आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या लोकसभा मतदारसंघाचा खासदार हे धैर्यशील पाटीलच असतील, असाही निर्धार अतुल काळसेकर यांनी या सभेत बोलताना व्यक्त केला आहे.