• Sat. Sep 21st, 2024
ज्याने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालून संपवलं तो मॉरिस भाई नेमका कोण?

मुंबई: ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेनं दहिसरमध्ये खळबळ उडाली आहे. मॉरीस नोरोन्हा उर्फ मॉरीस भाई याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आहे. या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर मॉरीस भाई फरार झाला होता. त्यानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं दहिसर हादरलं आहे.
आधी अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, नंतर स्वत:लाही संपवलं, अभिषेक यांच्यासह मॉरिसचा मृत्यू!
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे मॉरीस भाईने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते. कार्यक्रमाआधी मॉरीस भाईच्या फेसबुक अंकाऊटवरून मॉरीस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे लाईव्ह संवाद साधत होते. तेव्हढ्यातच घोसाळकर यांच्यावर मॉरीस भाईने बंदुकीचे पाच राऊंड फायर केले. यानंतर त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र छातीत गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यामुळे त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान घटनेनंतर मॉरीस भाई हा फरार झाला होता.

त्यानंतर त्याने स्वत:वर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली. फरार झालेल्या मॉरीस भाईने स्वत:वर चार गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत त्याचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान मॉरिसला एका गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला होता. अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच तुरुंगवास भोगावा लागला, असा गैरसमज मॉरीस भाईचा होता. तुरुंगातून सुटल्यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली. त्यांच्याजवळ चांगलं संबंध निर्माण केले. आजही मॉरीस भाई त्याच्या कार्यक्रमात घोसाळकरांना बोलवलं होतं. तिथेच त्याने हा रक्तरंजित खेळ खेळला. जुन्या वादातून त्याने हे कृत्य केले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महेश गायकवाड यांच्या प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांना गोळ्यांनी लक्ष्य, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

कोण आहे मॉरीस भाई?

एक समाजसेवक म्हणून मॉरीस भाईची ओळख आहे. मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई असं त्याचे नाव आहे. मॉरीस भाई बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीतील रहिवाशी आहे. दरम्यान मॉरीसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुक असे विविध गुन्हे दाखल आहेत. एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप मॉरीसवर असल्याच समोर आले आहे. तसेच त्याने वॉर्ड नंबर १ मधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती. तो समाजसेवेतही पुढे होता. लोकांना कपडे फळ आणि धान्य वाटण्याचं कामात तो पुढे होता. आजही अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अभिषेक घोसाळकरांना उपस्थिती लावली होती. तेव्हाच ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed