• Wed. Mar 18th, 2026
    Revenue Department Scam : महसूल विभागात कोट्यवधींचा घोटाळा, दीड-दोन लाख शेतकऱ्यांची गळचेपी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कबुली

    महसूल विभागात फार मोठा घोटाळा झाल्याचं स्वत: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलं आहे. आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत याबाबत लक्षवेधी मांडल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी घोटाळा झाल्याचं मान्य केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याच्या महसूल विभागात अतिशय मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांवर धनाड्य लोकांच्या आमिषाला बळी पडून कशाप्रकारे गैरप्रकार केला आहे ते आता उघड झालं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा घोटाळा झाल्याचं मान्य केलं आहे. तसेच या प्रकरणात कारवाई केली जात असल्याचं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलं आहे. या प्रकरणाची खूप मोठी व्याप्ती असल्याची माहिती स्वत: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे आगामी काळात महसूल विभागातील खूप मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विषयावर आज लक्षवेधी मांडली. यानंतर महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं. यानंतर संबंध प्रकार उघडकीस आला आहे.

    अनिल परब काय म्हणाले?

    “महाराष्ट्रात भ्रष्टाचारात कुणाला पहिला नंबर द्यायचा? याची स्पर्धा लागली आहे. कुठलं खातं दोन नंबरला ठेवायचं? यासाठी सरकारने परराज्याच्या लोकांनी एसआयटी ठेवावी लागेल. कारण या राज्यातील लोकांना जे अधिकार दिले जातात त्याचा गैरवापर कसा केला जातो ते सांगणारी ही लक्षवेधी आहे. या लक्षवेधीमध्ये जे अधिकारी महसूल कायद्याने दिले जातात. त्यामध्ये कलम 155, 182, 220 ही अशी वेगवेगळी कलम दिली आहेत. या कलमानुसार अधिकाऱ्यांना काही वेगळे स्पेशल अधिकार दिले आहेत. यामध्ये नोंदीत फेरफार करायची असेल तर ते अधिकार आहेत. पण या अधिकारामुळे बऱ्याच अभिलेखांमध्ये चुका होतात. या चुका दुरुस्ती करण्यासाठी वेगवेगळे कमल दिले आहेत.””155 मध्ये दुरुस्तीचे कलम आहे. कलम 182 मध्ये कसूर करणाऱ्या व्यक्तीची स्तावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 220 मध्ये त्याची नाममात्र बोलीवर खरेदी करणे. या सर्व कलमांतर्गत सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत. याचाच अर्थ फेरफार करणार हेच अधिकारी, दुरुस्ती करणार हेच अधिकारी, त्यामध्ये स्थावर मालमत्तेची जप्ती आणणार हेच अधिकारी, त्यावर बोली लावणारे हेच अधिकारी. सगळा माल कुठूनही या खिशातून दुसऱ्या खिशात, म्हणजे महसूल खात्याच्या अंतर्गत सगळा माल अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे.”

    “अशा सगळ्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या, सर्वसामान्य शेतकरी तक्रार घेऊन जातो तेव्हा तो रगडला जातो. पण मोठमोठे बिल्डर आणि धनिक असतील, हजारो एकर जमिनी असणारे शेतकरी असतील, अशा लोकांची कामे या सर्व कलमांखाली होत आहेत. म्हणून या कलमांच्याबाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या त्यावेळी शासनाने एक समिती गठीत केली. या समितीने मागच्या पाच वर्षात अशी किती प्रकरणे झाली याची चौकशी केली.”

    “या चौकशीत 38027 प्रकरणांपैकी 2382 प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यापैकी 247 प्रकरणात दोषी अधिकारी, त्यांच्यावर विभागीय कारवाई सुरु करणे, यामध्ये वेगवेगळे स्तर आणि शिक्षा देखील वेगवेगळ्या प्राधिकृत आहेत. अ वर्गातील अतिगंभीर अनियमितता, बेकायदेशीर असलेल्या 13 प्रकरणांत अतिगंभीर कारवाई करणे. महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत जबर शिक्षेसाठी विभागीय चौकशी सुरु करणे. ब वर्गासाठी अनियमितता-बेकायदेशीर असलेल्यांसाठी 247 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करणे. किरकोळ स्वरुप तर असंख्य.”

    “मला एकच प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं आपण आमच्या सर्वांच्या डोळ्याला पाणी लावण्यासाठी करताय का? सरकार चौकशी नेमते, मान्य करते, कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे मान्य करते पण कारवाई करत नाही. मग हे सगळं कशासाठी? पाच वर्ष अधिकाऱ्यांची चौकशी करताय. आपण काय कारवाई केली? काहीच कारवाई झालेली नाही. आपण या सर्व प्रकरणात काय कारवाई करणार आणि त्याचा रिपोर्ट हे अधिवेशन संपण्याआधी देणार का?”, असा प्रश्न अनिल परब यांनी केला.

    चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर काय?

    “मी या खात्याचा मंत्री झाला तेव्हा माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या. कलम 155 चा दुरुपयोग कोट्यवधी रुपयांच्या शासनाच्या महसूलाचे नुकसान करणारी कृती करण्यात आली. दुसरा गुन्हा म्हणजे जे अधिकार मंत्र्यांना आहेत ते परस्पर वर्ग 2 चे वर्ग 1 केले. काही ठिकाणी मालकी हक्कात बदल केला. हे अतिगंभीर आहे. जमिनीच्या क्षेत्रात वाढ करणे, घट करणे सारखे प्रकार घडले आहेत. इतर हक्काच्या लोकांची नावे काही ठिकाणी कमी केले. या तक्रारी माझ्याकडे आल्या. पुणे जिल्ह्यात 38 हजार 27 प्रकरण आहेत. आम्ही महाराष्ट्रातील इतर विभागांचे देखील तपासणार आहोत.”

    “महसूल खात्यात आतापर्यंतच्या प्रवासात सर्वात मोठी अनियमितता किंवा सर्वात गंभीर हे प्रकरण आहे. ज्यांनी या प्रकरणात दुरुपयोग करुन कितीतरी लोकांच्या आत्महत्या होतील, असं कृत्य केलं. मोठ्या माणसाने गरिबाला फसवलं. त्यांची जमिनी कमी करुन दिली. हे सरकारच्या लक्षात आलं आहे. या प्रकरणी रिपोर्ट आला आहे. अतिगंभीर प्रकरणात 15 अधिकारी आहेत. ब – गंभीर वर्गात 82 अधिकारी आहेत. क मध्ये 55 अधिकारी आहेत. आता हे महसूल खाते पूर्ण खाली होऊन जाईल.”

    “हा रिपोर्ट आमच्याकडे जानेवारी महिन्यात आला आहे. फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहेत. यासोबत असं राज्यात किती झालं आहे, किती लोकांचा यामध्ये जीव अटकला आहे, आपल्याला सगळं रिविव्ह्यू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना रिविव्ह्यू करण्याचे अधिकार दिले आहेत. अन्यथा हे एक-दीड लाख लोकांचे जीव घेणारे आहे. मी पुढच्या सात दिवसांत पुणे जिल्ह्यातील प्रकरणाची सविस्तर माहिती देईन. त्यानंतर राज्यभराची माहिती मिळवून पुढच्या अधिकारात माहिती देईन. राज्यातील दीड-दोन लाख कुटुंबाचा हा विषय आहे. माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.”

    यावेळी अनिल परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी केली. त्यावर महसूल मंत्र्यांनी अधिवेशन संपेपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि पुढच्या कारवाईची काय रुपरेषा असेल ते स्पष्ट केली जाईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा