• Sat. Jun 6th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar ZP : दोन्ही सेनेने मैदान सोडलं, छत्रपती संभाजीनगर झेडपीवर भाजपचा झेंडा, रात्रीची फिल्डिंग चर्चेत

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकवला असून अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. शिंदे गट आणि उबाठा गटाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

    भाजपची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर बिनविरोध सत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज अभूतपूर्व राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवला आहे. भाजपचे अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी, तर जितेंद्र जैस्वाल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, या निवडीदरम्यान शिंदे सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) या दोन्ही गटांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

    अतुल सावेंची फिल्डिंग

    या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून मोठी चढाओढ सुरू होती. दोन्ही बाजूंनी कुरघोडीचे प्रयत्न सुरू असतानाच, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी निवडीच्या आदल्या रात्रीपासूनच विजयाची गणिते जुळवायला सुरुवात केली होती. सावे यांनी मध्यरात्रीपासून लावलेली ‘फिल्डिंग’ भाजपसाठी गेमचेंजर ठरली. काँग्रेसचा एक सदस्य आधीच भाजपच्या गोटात होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या मदतीने भाजपने बहुमताचा जादूई आकडा यशस्वीपणे गाठला.

    दोन्ही शिवसेनांचा काढता पाय

    दुसरीकडे, विखुरलेल्या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली करत होत्या. युतीच्या चर्चेत ‘५०-५०’ चा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा होती, मात्र ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्याचे लक्षात येताच दोन्ही गटांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकून सभागृहातून काढता पाय घेतला. यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला आणि अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी भाजप उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.

    Maharashtra TimesSangli News : सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा

    गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष

    या विजयावेळी आमदार अनुराधाताई चव्हाण, प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. या विजयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडीचे पुढील परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर पडणार आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा