पोलिस आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर धोरण स्वीकारले आहे. हे धंदे चालविणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांची मंगळवारी पोलिस आयुक्तालयात झाडाझडती घेण्यात आली. त्यात कुख्यात गजानन मारणे, बाबा बोडके, नीलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह विविध टोळ्यांच्या म्होरके एका रांगेत उभे केले होते.
त्यानंतर शहरात अमली पदार्थ विक्री करणारे पेडलर, बेकायदा गावठी दारू विक्री करणारे आणि मटका, जुगार अड्डा चालविणाऱ्यांनाची बुधवारी दुपारी पोलिस आयुक्तालायात शाळा घेण्यात आली. बेकायदेशीर धंदे चालविल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. आयुक्तांच्या आदेशाने शहरातील अमली पदार्थ तस्कर, बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच, यावेळी चांगल्या वर्तणुकीची लेखी हमी त्यांच्याकडून घेण्यात आली.
‘मटका किंग’ला तंबी
‘पुण्यातील मटका किंग’ या नावाने मिरवणाऱ्या आणि पत्त्याचे मोठे क्लब चालवणाऱ्या सहा जणांना पोलिस आयुक्तांनी बोलावून तंबी दिली. ‘तुमचे धंदे ताबडतोब बंद करा, नाही तर इंगा दाखविन,’ असा संदेश त्यांना देण्यात आला.
‘रिल्स’वर ठेवणार ‘वॉच’
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली. गुन्हेगारी टोळक्यांचे म्होरके, सराइत गुंड रिल्स पोस्ट करत असतात. ते पाहून तरुणांना गुन्हेगारी क्षेत्राचे आकर्षण निर्माण होते आणि त्यांची पावले तिकडे वळतात, असा अनुभव आहे. त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाणार आहे.