महावितरणामध्ये नेमणुकीला असलेल्या एका अधिकाऱ्याची मुलगी लंडनमध्ये शिकत होती. नाताळच्या सुट्टीसाठी मुंबईत आलेली ही १९ वर्षांची तरुणी १३ जानेवारीला लंडनला जाण्यासाठी निघाली. वडील विमानतळावर सोडण्यासाठी सोबतच निघाले. ताडदेव येथे आल्यावर वडिलांनी कार थांबवली आणि औषधे आणण्यासाठी बाहेर पडले. त्याचवेळी काहीतरी वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे चालकाला सांगून मुलगी बाहेर पडली. रस्ता ओलांडून टॅक्सीत बसून पसार झाली. औषधे घेऊन परतलेल्या अधिकाऱ्याला चालकाने याबाबत सांगितले. त्यांनी मोबाइलवर मुलीस संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाइल बंद येत होता. ती कुठेच सापडत नसल्याने अधिकाऱ्याच्या पत्नीने ताडदेव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली.
अधिकाऱ्याची मुलगी गायब झाल्याने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके कामाला लागली. वडिलांनी एका तरुणावर संशय व्यक्त केला. काही वर्षांपूर्वी या विवाहित तरुणाने त्यांच्या मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणावर लक्ष केंद्रीत केले. बदललेले मोबाइल क्रमांक, वारंवार बदलणारे लोकेशन यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. २५ दिवसांच्या अविरत शोधमोहिमेनंतर पोलिसांनी कळव्यातून या तरुणीला शोधून काढले.
लाखोंचे दागिने घेऊन पसार
अधिकाऱ्याची मुलगी पळून जाताना लाखो रुपयांचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने घेऊन पसार झाली होती. ही मुलगी ज्या तरुणासोबत सापडली, त्याच्या भावाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले होते.