• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat : महिलेवरील अत्याचार प्रकरण; ज्योतिषी अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय

    मंत्र-तंत्र आणि अघोरी विद्येच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी ‘कॅप्टन’ उर्फ अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

    अशोक खरातला ७ दिवसांची पोलीस कोठडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत, मंत्र-तंत्राच्या बहाण्याने एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला अटक करण्यात आली असून, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    नेमकी घटना काय?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’च्या कार्यालयात घडला. संशयित आरोपी खरातने पीडित महिलेचा धार्मिक विश्वास संपादन केला होता. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी बोलावून गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी दिले. महिला संमोहित अवस्थेत असताना, तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती दाखवून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesSangli News : सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा

    अघोरी प्रथा आणि कायदेशीर कारवाई

    पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ७४, ३५२, ३५१(१) सह अत्यंत कडक अशा ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमा’ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

    राजकीय कनेक्शनमुळे चर्चेला उधाण

    अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ हा केवळ ज्योतिष क्षेत्रातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही परिचित असल्याचे समोर येत आहे. त्याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत निकटचे संबंध असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगली आहे. त्यामुळे या सात दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपीकडून नेमकी काय माहिती समोर येते आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावे उघड होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी काही महिलांची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा