सेंट्रल पार्कच्या देखभालीसाठी अभिव्यक्ती स्वारस्य देकार (ईओआय) पध्दतीचा वापर करून ते खासगी संस्थांना चालविण्यासाठी दिले जाणार आहे. लवकरच याबाबत निविदा मागवल्या जाणार असून, अटीशर्ती निश्चित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना पार्कमध्ये सशुल्क प्रवेश दिला जाणार आहे.
तब्बल २०.५ एकर जागेवर विस्तारलेल्या सेंट्रल पार्कमध्ये साडेतीन हजारपेक्षा अधिक विविध प्रकारची झाडे, फुलझाडे, मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट यांच्यासह योग, ध्यान धारणेसाठी स्वतंत्र विभाग, कारंजे, पाणवठा या सर्व सोयीसुविधा असलेले सेंट्रल पार्क ठाण्यात साकारण्यात आले आहे. ठाणेकरांना वृक्षांनी नटलेल्या या पार्कमध्ये मुक्त फेरफटका मारता येणार आहे. त्यामुळे वर्षाला अंदाजे आठ लाख ८४ हजार पौंड ऑक्सीजननिर्मिती होणार आहे. ठाणे पालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांतर्गत हे सेंट्रल पार्क विकसित कले असताना, त्याची निगा राखणे, डागडुजी करण्यासाठी अभिव्यक्ती स्वारस्य देकार (ईओआय) पध्दतीचा वापर करून खासगी संस्थांकडे काम सोपवले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पार्कच्या प्रवेशासाठी २० रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुर्मिळ वृक्ष साधणार नागरिकांशी संवाद
सेंट्रल पार्कला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ठाणे शहरातील हेरिटेज ट्री व दुर्मिळ वृक्ष यांची माहिती व्हावी यासाठी ‘स्पीकिंग ट्री’ हा उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. सेंट्रल पार्कमधील दहा हेरिटेज ट्री (५० वर्षांवरील) व दुर्मिळ वृक्षांवर व्हिडीओ क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. हा क्यू आर कोड स्मार्ट फोनद्वारे स्कॅन केल्यानंतर त्या झाडांची माहिती देणारा व्हिडीओ सादर होईल व झाड जणू प्रत्यक्षात आपल्याशीच बोलत आहे, याची अनुभूती नागरिकांना अनुभवता येईल. तसेच टप्प्याटप्प्याने सेंट्रल पार्कमधील इतर वृक्षांवरसुद्धा क्यू आर कोड लावण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक वृक्षांची माहिती इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये नागरिकांना माहिती वाचता येणार असल्याचे उपायुक्त (उद्याने) मिताली संचेती यांनी सांगितले.
दर रविवारी हेरिटेज ट्री ट्रेल
वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून देण्यासाठी दर रविवारी हेरिटेज ट्री ट्रेल येथे आयोजित करण्यात येणार आहे. या ट्रेलसाठी एकूण १० ठिकाणांवरील २३ वृक्ष निवडले जाणार असून, या वृक्षांनाही क्यू आर कोड बसविण्यात येत आहेत. गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणानंतर ठाणेकरांनी या ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कला भेट द्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.