‘बिग बॉस १२’ फेम अभिनेता शिवआशिष मिश्राच्या गाडीला समृद्धी महामार्गावर सिन्नर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शिवआशिष गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवआशिष मिश्रा आपल्या ‘टोयोटा हायलेक्स’ गाडीने मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होते. सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवार येथील चेनेज नंबर ५३८ जवळ त्यांची गाडी आली असता, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला अचानक ‘कट’ मारला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला. या धडकेत शिवआशिष यांच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या सहकाऱ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
तातडीने वैद्यकीय मदत
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील ‘रेस्क्यू टीम’ तातडीने घटनास्थळी दाखल झाली. टीमने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दोन्ही जखमींना कोपरगाव नजीक असलेल्या श्री जनार्दन स्वामी (SJS) हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, शिवआशिष यांच्या इच्छेनुसार आणि दुखापतीचे गांभीर्य ओळखून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
Chhatrapati Sambhajinagar ZP : दोन्ही सेनेने मैदान सोडलं, छत्रपती संभाजीनगर झेडपीवर भाजपचा झेंडा, रात्रीची फिल्डिंग चर्चेत
घटनेची माहिती मिळताच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी रुग्णालयात धाव घेत शिवआशिष यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मनोरंजन विश्वात खळबळ
शिवआशिष मिश्रा हे मूळचे इंदूरचे असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. २०१८ मध्ये ‘बिग बॉस १२’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमुळे ते घराघरात पोहोचले होते. तसेच ‘संकट मोचन महाबली हनुमान’ या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात आहे.
समृद्धी महामार्गावर लेन बदलताना किंवा ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या वावी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
