अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेले असून हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे कुणीही या वक्तव्याचा विपर्यास करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली. त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही, अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती. अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका असे अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत आपण आवाहन केले होते.
सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे. मात्र समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाला आवाहन करताना भुजबळ म्हणाले होते, ‘राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये’
भुजबळ यांच्या वक्तव्यावर नाभिक समाजाने आक्षेप नोंदवला होता. भुजबळांनी माफी मागावी, अन्यथा राज्यभरात निषेध करू, असा इशाराही नाभिक समाजाकडून देण्यात आला होता. त्यांना होत असलेला वाढता विरोध पाहून भुजबळ यांनी एक पत्रक काढून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.