अहमदनगर: सदरक्षणाय खलनिग्रणाय हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य आहे. या वाक्याला आणि पोलीस खात्याला, लोकशाहीला, ग्रहविभागाला, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बाब घडली आहे. जे पोलीस महिलांचं रक्षण करतात, तेच पोलीस भक्षक बनत आहेत. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा या छोट्याश्या गावात राहणारी पारधी समाजाच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना भुम तालुक्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आश्रम शाळेतील मुलांना आणण्यासाठी गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका पारधी महिलेवर भुम येथील पोलिसानेच एका होमगार्ड कर्मचाऱ्याच्या मदतीने महिलेवर पाशवी अत्याचार केला आहे. भुम तालुक्यातील परांडा रोडवरील एका ज्वारीच्या शेतात ही घटना घडली आहे. पोलिसानेच होमगार्डच्या मदतीने बलात्कार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके, पोलीस ठाणे भुम आणि सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता खर्डा येथून भूमकडे निघाले. त्यावेळी दुपारी ३:००च्या सुमारास भुम बस स्टॅन्ड येथे ते पोहचले. बसची वाट पाहत होते. यानंतर त्या ठिकाणी एक इसम आला. तुम्ही येथे का थांबला आहेत, तुम्ही चोर दिसता, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो मी पोलीस आहे, असे म्हणून त्याने मोबाईलवर दुसऱ्या व्यक्तीला फोन लावला. बस स्टँडमध्ये गाडी घेऊन ये, असे सांगितले. यानंतर पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी त्या ठिकाणी आली. तसेच पिडीत महिलेकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. नाहीतर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा दम दिला. त्या पीडित महिलेने वारंवार विनंती करून देखील ते ऐकत नव्हते. त्यावेळी त्या पिडीत महिलेने जामखेड तालुक्यातील नायगाव येथील ऊसतोड कामगारांचे मुकादम नंदू उगले यांना फोन लावून पैसै पाठवण्यास सांगितले. त्यांनी होमगार्ड सागर माने यांच्या फोन पे ला १०,००० हजार रुपये पाठवले.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर भुम पोलीस स्टेशनचे आरोपी पोलीस दगडू भुरके हा म्हणाला की, मी तुम्हाला बार्शी येथे जाणाऱ्या गाडीत बसवून देतो, असे म्हणून तिच्यासोबत असलेल्या दिराला आणि पिडीत महिलेला परांडा रोडकडे घेऊन गेले. आरोपी पोलीस हा तिच्या दिराला म्हणाला की, तू हिथेच थांब पोलीस स्टेशनमधून मला फोन आला आहे. तू मॅडमला भेटायला चल, असे म्हणून तू माझ्यासोबत शारीरिक संबंध बनव. तुला मॅडमकडून सोडवतो. तसेच तुझ्या दिराला केसमध्ये अडवणार नाही. त्यावेळी त्या पीडित महिलेने खुप विनंती केली. मी तसे काही करणार नाही. तरीसुद्धा त्या पोलीस कर्मचाऱ्याने हाताला धरून तिच्यावर बळजबरी करून ज्वारीच्या शेतात घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला.
यानंतर पिडीत महिलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम आणि तिच्या वडिलांना सांगितला. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके पोलीस ठाणे, भुम व सागर चंद्रकांत माने. रा. भुम जिल्हा उस्मानाबाद या दोघांविरुद्ध भुम पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पीडितेला ॲड अरुण जाधव आणि विलास पवार यांनी मदत केली. या पीडितेला मदत करण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत.