• Mon. Nov 25th, 2024
    कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने घेतली मुख्यमंत्र्यांच्या लेकाची भेट!

    पुणे : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असतानाच आज कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आज जन्मदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ यांचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. यातच त्यांनी वर्षा येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नेमकं राज्यकर्त्यांचा गुन्हेगारांसोबत काय अस्तित्व आहे? असा मोठा प्रश्न तर सर्वसामान्य नागरिक करत आहे.

    कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या जवळच्या साथीदाराने त्याचीच ५ जानेवारी रोजी गोळी झाडून खून केला होता. त्यानंतर पुण्यात अतिशय भीतीचं वातावरण होतं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांची भेट घेतली होती. भेटीचे फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पार्थने भेट घ्यायला नको होती. अशा प्रकारच्या भेटी राजकारण्यांनी टाळल्या पाहिजेत, असे खडे बोल सुनावले होते.

    मात्र राजकीय नेते-गुंड आणि त्यांचे पक्षप्रवेश जणू राजकीय प्रघातच पडलाय. कुख्यात गुंड शरद मोहोळ हा भारतीय जनता पक्षात सक्रिय राहून काम करत होता. तर गुंड गजानन मारणे याच्या पत्नीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

    एकीकडे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार ताजा असताना, गुंड हेमंत दाभेकर याने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने या भेटीची चर्चा होतीये.

    हेमंत दाभेकर कोण आहे?

    गुंड हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणेच्या खून प्रकरणात शरद मोहोळ सोबत शिक्षा भोगत होता. सोबत त्याच्यावर खंडणी, अपहरण, खून अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाढदिवसाचं निमित्त असलं तरी मात्र या भेटीचं काही वेगळं कारण होतं का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *