• Mon. Nov 25th, 2024
    ‘मराठा’ सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल, सर्वेक्षणातील माहितीसाठा विश्लेषणासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडे

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यात सुमारे पावणेतीन कोटी कुटुंबांच्या सर्वेक्षणात सर्वाधिक सर्वेक्षण हे पुणे विभागात १०० टक्के इतके झाले आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात ९७ टक्के इतके झाले आहे. तर सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत राज्यात सर्वेक्षण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वेक्षणाचा माहितीसाठा गोखले इन्स्टिट्यूटकडे सुपूर्द करण्यात आला असून दुबार माहिती तसेच अन्य माहितीचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष विश्लेषणाला सुरूवात केले जाणार आहे. त्यानतंर येत्या आठवड्यात त्याचा अहवाल आयोगाला देण्यात येणार आहे.
    राज्य मागासवर्ग आयोगाने काल रात्री मराठा समाजाचे सर्वेक्षण संपविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील विविध विभागांतून हे सर्वेक्षण संपविण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागांकडून सर्वेक्षणाचा माहितीसाठा हा आयोगाकडे देण्यात आला. त्यानतंर गोखले इन्स्टिट्यूटकडे पुढील प्रक्रियेसाठी शनिवारी सुपूर्द करण्यात आला.

    २५० प्रोसेसरचा वापर

    सर्वेक्षणाच्या सुरूवातीला अॅपमध्ये गावांसह नगरपालिकांची नावे गायब असणे, सर्व्हर स्लो सुरु असणे असे तांत्रिक अडथळे आले होते. त्यावर मात करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटने सुरुवातीला ४० ते ४८ प्रोसेसरचा वापर सुरू केला होता. मात्र, अडथळ्यामुळे पाचपट म्हणजेच सुमारे २५० इतके प्रोसेसर वाढवून सर्व्हरची क्षमता वाढविली होती.

    १७ नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली, १६ नोव्हेंबरला मी राजीनामा दिला; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
    सर्वेक्षणाचा डाटा एक टीबी

    राज्यात सुमारे दीड लाख प्रगणकांसह कर्मचारी अधिकारी असे सुमारे दोन लाखांहून अधिक व्यक्ती सर्वेक्षणाच्या कामात गुंतले होते. तर प्रत्यक्ष राज्यातील दोन कोटी ७२ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. त्या सर्वांचा माहितीसाठा सुमारे एक हजार ‘जीबी’ अर्थात एक ‘टेरा बाईट’ (टीबी) इतका मोठा जमा झाला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाच्या विश्लेषणाला वेळ लागण्याची शक्यता आहे. ही माहिती सर्व्हरवर आपोआप ‘अपलोड’ होत आहे. त्यातील अचूकता अधिक आहे. सर्वेक्षणातील संकलित माहितीचे तसेच त्यातील दुबार माहितीचे (डी डुप्लिकेशन क्लिनिंग) शुद्धीकरण करण्याचे काम गोखले इन्स्टिट्यूटकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आज, रविवारी दुपारपर्यंत माहितीचे शुद्धीकरण पूर्ण करून प्रत्यक्ष आकडेवारी समोर येईल. त्यानंतर माहितीच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यात येईल, असेही सूत्राकडून सांगण्यात आले.

    जिल्हानिहाय विश्लेषण

    मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी माहितीसाठ्याचा वापर होणार आहे. विविध योजना राबविण्यात येत असून त्यासाठी या माहितीसाठ्याचा वापर होईल, असे सांगितले जाते. हे सर्वेक्षण सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज गोखले इन्स्टिट्यूटने वर्तविला आहे. शुद्धीकरणानंतर यातील प्रमाणक कमी जास्त होऊ शकेल. प्रत्येक जिल्हा, विभागनिहाय तसेच निकषांच्या आधारे माहितीचे विश्लेषण केले जाईल. डेटा प्रोसेसिंग करणे, डेटा ग्राफिक्स करणे यासारख्या विविध पद्धतीने विश्लेषण केले जाईल. त्यानंतर गोखले इन्स्टिट्यूटकडून राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल देण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

    विभाग सर्वेक्षणाचे प्रमाण टक्क्यांत

    पुणे १००
    छत्रपती संभाजीनगर ९७
    कोकण ९५
    नागपूर ९५
    नाशिक ९१
    अमरावती ९०
    एकूण ९५

    आरक्षण मिळालं, गुलाल उधाळला, तर पुन्हा उपोषण कशाला? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *