• Sat. Sep 21st, 2024

घरातून लसूण हद्दपार होणार, लसणाची फोडणी महागणार; दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

घरातून लसूण हद्दपार होणार, लसणाची फोडणी महागणार; दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: गेल्या आठ महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी प्रमाणात लसूण येत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ सुरू आहे. आता ८० ते १०० रु. किलो असणारा लसूण घाऊक बाजारात २०० ते ३५० रु. किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण ४०० रु. किलोच्या घरात गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लसूण खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून लसणाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. नेहमी ८० ते १०० रु. किलो असणारा लसणाचा दर १०० रु. किलोंपासून वाढत आता चक्क ४०० रु. च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून लसूण हद्दपार होऊ लागला आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी लसणाच्या दरात वाढ झाली होती आणि चांगला लसूण २०० रु. किलोपर्यंत गेला होता, मात्र आता या आठवड्यात लसणाच्या दराने आणखी उसळी घेतली असून चांगला लसूण घाऊक बाजारातच ३५० रु. किलोपर्यंत आणि किरकोळ बाजारात ४०० रुपयांवर गेला आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक दर आहेत.

मागच्या दोन वर्षांत लसणाचे दर तुलनेने कमी होते. घाऊक बाजारात लसूण ५० ते ८० रु. किलोपर्यंत होता. हे लसणाचे सर्वांत कमी दर होते. यातून उत्पादन खर्चही निघत नव्हता, दर पडत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन घेणेच थांबवले होते. मागच्या वर्षभरात बहुतांश शेतकऱ्यांनी लसूणलागवड केलीच नव्हती. त्यामुळे आता बाजारात लसणाची कमतरता जाणवायला लागली आहे. उत्पादन आणि पर्यायाने आवक कमी असल्याने घाऊक बाजारात लसूण ३५० रु. किलो झाला आहे.

० सुकलेला बारीक पाकळ्यांचा लसूण हातात २०० रु किलो

० मध्यम आकाराचा लसूण २५० ते ३०० रु किलो

० सर्वात चांगला आणि मोठ्या पाकळ्या असलेला लसूण ३५० रु किलो

यात्रेनिमित्त १३० क्विंटल भाजी, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

दर कमी होण्यास आणखी चार महिने

घाऊक बाजारात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून लसूण बाजारात येत आहे. या वर्षीचे पीक यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा नवीन लसूण बाजारात पाहायला मिळत आहे, मात्र लसणाचे दर कमी होण्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed