रावेर लोकसभेच्या उमेदवारीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मुलगी केतकी पाटीलसह भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे ही जागा नाईलाजाने शरद पवार गटाला सोडावी लागली. या जागेवरून आधीच एकनाथ खडसे यांनी दावा दाखल केला होता. ही जागा राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढवणारच, असे वारंवार त्यांनी सांगितले होते. अखेर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आल्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
जळगाव जिल्ह्यात सध्या काँग्रेसची स्थिती बेघर झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा दोन्ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आल्या आहेत. काँग्रेसचा जिल्ह्यात आधी पाया मजबूत होता. मात्र गेल्या दहा वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांवर काँग्रेसला कुठलीही जोखीम घेण्याची स्थिती नसल्याने त्यांना लोकसभेच्या दोन्ही जागांवर अखेर पाणी सोडावे लागले हे मात्र निश्चित आहे.
रावेर लोकसभा २००९ पासून स्थापित
२००९ च्या पूर्वी जळगाव जिल्ह्यात दोन खासदार निवडून येत होते. मात्र लोकसंख्येच्या आधारे जळगाव जिल्ह्याचे लोकसभा निवडणुकी संदर्भात दोन भाग करण्यात आले, यात जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा असे विभाजन करण्यात आले. रावेर लोकसभेत भुसावळ, जामनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर हा भाग जोडण्यात आला. २००९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून स्व. हरिभाऊ जावळे हे २८ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीकडून रवींद्र पाटील यांनी उमेदवारी केली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत स्व. हरिभाऊ जावळे यांचे दहा उमेदवारांमध्ये तिकीट फायनल झाले होते. मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि स्व हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी पक्षाने नाकरली आणि एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. खडसे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी पक्षातर्फे मनीष जैन उमेदवारी करीत होते तसेच त्या काळात काँग्रेसमध्ये असलेलेच डॉ. उल्हास पाटील यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांना अवघी २१ हजार ३३२ मते मिळाली होती.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने अखेर रावेर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे सोडावी लागली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाकडून डॉ. उल्हास पाटील आणि भाजपकडून खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि जवळपास तीन लाखांच्या मताधिक्यांनी रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय झाला होता.
लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीपासून आतापर्यंत रावेर लोकसभेवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम अबाधित राहिले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने-सामने बघायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून खुद्द एकनाथ खडसे हे उमेदवारी करतात की त्यांची सून रक्षा खडसे या उमेदवारी करता हे बघावे लागेल.
एकंदरीत बघता २००९ पासून ते आतापर्यंत रावेर लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या २०२४ च्या निवडणुकीत भाजप आपला बालेकिल्ला मजबूत राखणार की ढासळणार हे बघणे महत्त्वाचे आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News