• Mon. Nov 25th, 2024

    आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर गार्डी (ता.खानापूर) येथे अंत्यसंस्कार

    ByMH LIVE NEWS

    Jan 31, 2024
    आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर गार्डी (ता.खानापूर) येथे अंत्यसंस्कार

    सांगली, दि. ३१ : आमदार अनिल बाबर विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे लोकप्रतिनिधी होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो हे दाखवून देणारे ते आदर्श लोकप्रतिनिधी होते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    खानापूर – आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अल्पश: आजाराने सांगली येथील खासगी रुग्णालयात आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर तालुक्यातील गार्डी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, आमदार शहाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, दिनकर पाटील आदींसह सर्वपक्षीय नेते, अधिकारी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अनिल बाबर यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी खूप काम केले. कृषी, पाणी, रस्ते, वीज इत्यादी कामांबाबत त्यांचा पाठपुरावा नेहमी असायचा. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. जनतेने प्रेम, जिव्हाळा व आत्मियता त्यांना दिली. लोकांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करुन प्रत्येकाला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी मदत केली. टेंभू योजनेसाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. अन्य राज्यातही त्यांचा मोठा जनसंपर्क होता.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरामध्ये तळागाळातून काम सुरु केले होते. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि चारवेळेस आमदार म्हणून त्यांनी या भागाची सेवा केली. या भागात पाणी पोहोचले पाहिजे, सिंचन झाले पाहिजे या करिताचे त्यांचे प्रयत्न कोणीच विसरु शकत नाही. जनसामान्यांशी आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. जनसामान्यांचा एक नेता हरवला, अशा प्रकारची भावना त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे.

    पालकमंत्री डॉ. खाडे यांनी अनिल बाबर आणि आपला चांगला स्नेहबंध होता. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी निघून गेला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

    मंत्री श्री. केसरकर यांच्यासह मान्यवरांनी आमदार अनिल बाबर यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

    यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती धोडमिसे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवास पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. आमदार अनिल बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed