राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू असून, सोमवारी पक्षाचे व्हिप आमदार अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदविण्यात आली. या वेळी पाटील यांनी अनेक धक्कादायक विधाने केली. शरद पवार गटाच्या वकिलांनी या वेळी पाटील यांची फेरसाक्ष घेतली.
भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःहून कळविल्याचे अनिल पाटील यांनी फेरसाक्षीदरम्यान सांगितले. पक्षात प्रवेश घेतल्यापासून आपल्याला शरद पवार यांच्याविषयी पक्षातील अनेकांच्या मनात असंतोष असल्याचे जाणवले, तसेच आपल्याही मनात हळुहळू निर्माण होऊ लागला, असे वक्तव्य या वेळी पाटील यांनी केले. असंतोष असूनही मग पक्षात का काम करीत होता, असे वकिलांनी विचारल्यावर, पक्षात काम करण्याची इच्छा असल्याने आपण काहीही बोललो नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
पाटील यांनी फेरसाक्षीदरम्यान, पक्षात मनमानी कारभार सुरू असे, तसेच कोणत्याही निवडणुका होत नसे, तर शरद पवार यांच्याकडूनच नेमणुका होत असल्याचे सांगितले. त्यांच्याशी काही ठराविक नेतेच बोलत, असा दावा पाटील यांनी केला. पवार यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतरही अनेकांच्या मनात त्यांनी तो परत घेऊ नये, असे होते; परंतु जनतेसमोर पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी माझ्यासह अनेकांनी राजीनामा मागे घेण्यासाठी जाहीर वक्तव्ये केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.