राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे-जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले आहेत. त्यांच्या समोर आम्ही पर्याय उभा करीत असून तरुण, नवा चेहरा प्रशांत यादव यांच्या निमित्ताने पुढे आणण्याची संधी मिळाली असल्याचे मत व्यक्त केले. एक- एक मतदारसंघ आम्ही बारकाईने हाताळत आहोत. कोकणातील चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. या मतदारसंघात आम्हाला तरुण, नवा चेहरा पुढे आणण्याची संधी मिळाली असून त्यांनी उभ्या केलेल्या वाशिष्टी डेअरीच्या प्रकल्पाचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीब सिद्दिकी, प्रदेश उपाध्यक्ष व चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक बबन कनावजे व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, प्रांतिक चे सहसचिव बशीर मुर्तुझा, सरचिटणीस प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेत्या नलिनीताई भुवड, रत्नागिरीच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी, युवकचे जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर आदी उपस्थित होते.
प्रशांत यादव सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. चिपळूण येथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी राजकीय अस्तित्व दाखवून दिले. ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होत्या. यावेळी यादव यांच्या समर्थकांनीही प्रवेश केला आहे.