• Mon. Nov 25th, 2024

    जिल्ह्यात तिसरी महापालिका? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारने मागवला अभिप्राय

    जिल्ह्यात तिसरी महापालिका? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारने मागवला अभिप्राय

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागवला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ जिल्ह्यात तिसरी महापालिका निर्माण होण्याच्या मागणीला बळ मिळाले आहे.

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश होऊन हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नवीन गावांचा या पालिकांमध्ये समावेश करणे योग्य होणार नाही. चाकण नगर परिषद, आळंदी नगर परिषद आणि राजगुरू नगर परिषद; तसेच त्यांच्या लगतच्या गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबत मागणी होत आहे. या अनुषंगाने स्वतंत्र महापालिका स्थापन करणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

    वास्तविक, देहू-आळंदीसह आजूबाजूच्या गावांचा पिंपरी-चिंचवडमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव २०१५मध्ये या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने केला होता. त्यात शहराच्या पूर्व भागातील निरगुडी, धानोरे, चऱ्होली खुर्द, आळंदी, केळगाव, कुरुळी, चिंबळी, खराबवाडी, निघोजे, महाळुंगे, येलवाडी यांचा समावेश होता. पश्चिम भागातील देहूसह हिंजवडी आणि अन्य गावांचा समावेश त्यात होता; परंतु हे दोन्ही प्रस्ताव सरकारी पातळीवर प्रलंबित आहेत. त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आता नव्यानेच स्वतंत्र पालिकेबाबत सूचना प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

    मुख्यमंत्र्यांकडून हद्दवाढीचे संकेत

    स्थानिक पातळीवरील मागणी आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या विरोधामुळे पूर्व भागातील गावांच्या पिंपरी-चिंचवडमधील समावेशाचा प्रस्ताव बारगळला. स्वतंत्र नगरपालिका स्थापन झाल्यामुळे देहूच्या समावेशाची शक्यता मावळली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे आणि गहुंजे ही सात गावे पालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीचे संकेत देऊन तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पूर्वेकडील गावांच्या पिंपरी-चिंचवडमधील समावेशाची शक्यता दुरावली आहे.

    गावांच्या समावेशाचा गांभीर्याने विचार

    चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिषद भौगोलिकदृष्ट्या पिंपरी-चिंचवडच्या नजीक आहेत. त्यामुळे या पालिकेच्या वाढीव क्षमतेबाबत अनेकदा चर्चा झाली. समावेशाची शक्यता असलेल्या गावांतून प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, विस्ताराच्या नावाखाली गावे समाविष्ट करण्यास पिंपरी-चिंचवड सक्षम आहे, की नाही, याचा साकल्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली जात होती. त्यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे या पत्रामुळे स्पष्ट झाले आहे.

    पत्रात म्हटले आहे…

    चाकण, आळंदी आणि राजगुरू नगर परिषद आणि त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशील घ्यावा. तिन्ही नगर परिषदांतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेचे आयुक्त, चाकण, आळंदी, राजगुरू नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अभिप्रायासह सरकारला सादर करावा, असे पत्रात नमूद केले आहे.
    रस्ता खोदायचाय? मग दुरुस्तीही करा; जाणून घ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण
    ‘हडपसर’चा प्रस्ताव विचाराधीन

    – पुण्यात फुरसुंगी, उरुळी देवाची स्वतंत्र नगरपालिका स्थापन केली आहे. हडपसर स्वतंत्र पालिकेचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

    – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आसपास ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार या महापालिका निर्माण झाल्या आहेत.

    – त्या धर्तीवर सांस्कृतिक राजधानी आणि शैक्षणिक माहेरघर असलेल्या पुणे आणि परिसरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त महापालिका स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    नगरविकास खात्याचे लेखी पत्र मिळताच महापालिकेकडून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला जाईल. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची आतापर्यंत झालेली हद्दवाढ, वाढती लोकसंख्या, नवीन गावे समाविष्ट करण्याची क्षमता या अनुषंगाने माहिती दिली जाईल. पालिकेचे मत स्पष्ट केले जाईल.- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed