मविआची बैठक गुरुवारी दुपारी नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित करण्यात आली होती. वंचितचा समावेश मविआमध्ये होणार का, याविषयीची चर्चा सुरू असतानाच, दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मविआकडून पाठविण्यात आलेले पत्र ‘एक्स’वर प्रसिद्ध केले.
पत्रात मविआ नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांना बैठकीसाठी प्रतिनिधी पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. ‘राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा करीत आहोत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून, २५ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावे, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. कृपया वंचिततर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती’, अशा आशयाचे पत्र आंबेडकर यांना नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सहीनिशी पाठविण्यात आले.
यावर आंबेडकर यांनी त्यांचे उत्तर पत्राच्या माध्यमातून कळविले आणि ते ‘एक्स’वर प्रसिद्ध केले. यात त्यांनी नाना पटोले यांच्या सहीनिशी आलेल्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेस हायकमांडने राज्यातील युती-आघाडीसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का, असा प्रश्न त्यांनी पटोले यांना केला. तसेच महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल, तर त्यावर तिन्ही घटक पक्षांच्या अध्यक्षांचे म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची सही असलेल्या निमंत्रणाशिवाय बैठकीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच, किमान काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही संपर्क साधला तर आघाडीच्या बैठकीत हजर राहण्याचा विचार करण्यात येईल, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.
आंबेडकरांच्या या पवित्र्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधत चेन्नीथला यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. तसेच राज्यात जागावाटपाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिल्याचे स्पष्ट केले. चर्चेअंती, आंबेडकर यांनी चेन्नीथला यांचे निमंत्रण स्वीकारत ३० जानेवारीला होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारले. वंचित बहुजन आघाडीकडून याविषयी दुजोरा देण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News