• Sun. Sep 22nd, 2024

‘कर्तव्यपथा’वर नाशिकची सलामी; प्रजासत्ताकदिनीच्या परेड, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १२ कॅडेट्सची निवड

‘कर्तव्यपथा’वर नाशिकची सलामी; प्रजासत्ताकदिनीच्या परेड, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १२ कॅडेट्सची निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एनसीसीच्या प्रत्येक कॅडेटचे स्वप्न म्हणजे २६ जानेवारीला दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणे. यंदा नाशिकच्या १२ कॅडेट्सना ही संधी मिळाली असून, यामधील दोन विद्यार्थी आज (दि. २६) दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या रिपब्लिकन डे (आरडी) परेडमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच १० विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणात सहभागी होणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात सात महाराष्ट्र बटालियन अंतर्गत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण दिले जाते. एनसीसीमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये या बटालियनमधील कॅडेट्सचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. यंदाही २६ जानेवारीला दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या आरडी परेड व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील १२ कॅडेट्स सहभागी झाले आहेत. भोंसला मिलिटरी कॉलेजच्या एनसीसी सिनियर युनिटमधील मयूर पिंपळे व बीवाके कॉलेजच्या एनसीसी ज्युनियर युनिटमधील पर्वणी जोशी यांची आरडी परेडसाठी निवड झाली आहे. १ जानेवारीपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॅम्पमध्ये हे दोघे सराव करीत असून, आज ते कर्तव्यपथावर पंतप्रधानांसमोर होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.

स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्ये (एसएनआयसी) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी मिळते. यासाठी महाराष्ट्रातल्या सात वेगवेगळ्या ग्रुपमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई बी ग्रुपची निवड करण्यात आली. मुंबई बी ग्रुप मध्ये अनेक बटालियन असून, त्यामधून नाशिकच्या सात महाराष्ट्र बटालियनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दहा विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘गणपती व ढोल’ थीमवर या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांसमोर नृत्य सादरीकरण होणार आहे. देशातील अन्य १७ राज्यांमधील विद्यार्थ्यांचे संघही या कार्यक्रमात आपापल्या राज्याचे सादरीकरण करणार आहेत. सात महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल तरुण खन्ना, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रवी व्यास, भोंसला मिलिटरी कॉलेजचे एनसीसी अधिकारी मेजर विक्रांत कावळे, बटालियनचे सुभेदार मेजर राम निवास आणि बटालियनचे सर्व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळाले आहे.

प्रभू श्रीरामांनी आम्हाला सर्व व्यवस्थित करण्यासाठी आशीर्वाद द्यावे, अजित पवारांची प्रार्थना

हे विद्यार्थी करणार सादरीकरण

पंतप्रधानांसमोर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सानिका जोशी, जान्हवी बोरसे, अंजली सिंग, सिद्धी देवरे, विद्या सांगळे, अमन कनोजिया, तनिष्क कोळपे, अनिकेत भार्गवे, सुनील अष्टेकर, वैभव झाके हे दहा विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

दोन कॅडेट्सचा विशेष गौरव

सात महाराष्ट्र बटालियनचे दोन कॅडेट्स विविध कॅम्पमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट सादरीकरण करीत विशेष गौरवाला पात्र ठरले आहेत. बीवायके कॉलेजमधील श्रुती अमृते व एचपीटी कॉलेजचा चैतन्य कपोते हे कॅडेट्स डीजी एनसीसी कमेंडेशन कार्ड अॅवॉर्डसाठी पात्र ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed