सर्वशक्तीमान भाजपविरोधात एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली. शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत, विनायक राऊत, काँग्रेसतर्फे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड तसेच राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले सीपीआय, सीपीएम तसेच शेकापच्या प्रतिनिधींनी देखील बैठकीला हजेरी लावली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल सात झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर चर्चा होऊन जागावाटप सुखरूप पद्धतीने पार पडली, अशी माहिती राऊत यांनी दिली.
७ तास बैठक, ४८ जागांवर चर्चा
“आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे माध्यमांनी पाहावं, आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलो आहे. ७ तास चाललेल्या बैठकीत जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली. मविआ अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे. आम्ही एकत्रित येऊ नये, एकत्र लढू नये, यासाठी काही लोक देव पाण्यात ठेवून बसले होते. त्यांना मला सांगायचंय येत्या ३० तारखेला आम्ही पुन्हा एकत्रित बसतोय.
आमच्याकडून वंचितला निमंत्रण मिळालं
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संवाद सुरू आहे. आज सकाळी सुद्धा आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आहे. त्यानंतर आमच्या प्रमुख नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतील नेत्यांनी देखील आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. वंचित हा महत्त्वाचा पक्ष आहे. देशात लोकशाही राहावी ही आमची जशी भूमिका आहे, तशी त्यांचीही आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीयेत. राजू शेट्टी यांच्याशी देखील आमची चर्चा आहे.
कोण किती जागा लढवणार?
कोण किती जागा लढवणार? या प्रश्नावर राऊत म्हणाले, तुम्ही फॉर्म्युल्यावर जाऊ नका. समजा एखाद्या जागेवर आमच्या घटकपक्षातील कुणाचाही उमेदवार विजयी झाला असला तरी प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे, असं समजून आम्ही तिथे ताकदीने लढू, असं सांगताना जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचा मूळ प्रश्न राऊत यांनी सफाईदारपणे टाळला.