• Mon. Nov 25th, 2024

    निवडणुकीत हरविल्याचा राग, संपविण्यासाठी ४ लाखांची सुपारी पण प्लॅन फेल, असा झाला पर्दाफाश

    निवडणुकीत हरविल्याचा राग, संपविण्यासाठी ४ लाखांची सुपारी पण प्लॅन फेल, असा झाला पर्दाफाश

    नागपूर : मांगरूळचे उपसरपंच गब्बर देवराव रेवतकर( वय ४२ रा.मांगरूळ) यांना ठार मारण्यासाठी चार लाखांमध्ये सुपारी देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांगरूळमधील उपसरपंचावरील गोळीबाराचा पर्दाफाश करून स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी सूत्रधारासह तिघांना अटक केली. सूत्रधार अमोल उर्फ रामेश्वर विठ्ठल गंधारे (वय ३० रा. मांगरूळ), कार्तिक रामेश्वर पंचबुदे (वय २६) आणि लक्ष्मण तुकाराम राठोड (वय ४० रा.तेलकवडसी ,ता.उमरेड),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

    गब्बर यांनी निवडणुकीत अमोल याला पराभूत केले. त्यामुळे अमोल हा संतापला होता. याशिवाय अमोल हा अवैध दारू विक्री करतो. याबाबतही गब्बर यांनी पोलिसांत तक्रार केली होती. अमोल याने लक्ष्मण व त्याचा साथीदार कार्तिक या दोघांना चार लाख रुपयांमध्ये गब्बर यांना ठार मारण्याची सुपारी दिली. अमोलने दोघांना गब्बर यांच्या दैनंदिन कार्याची माहिती दिली.

    मंगळवारी पहाटे गब्बर हे मॉर्निंग वॉक करून घरी परत जात होते. याचदरम्यान कार्तिक व लक्ष्मण हे दोघे मोटारसायकल आले. लक्ष्मण याने गावठी बंदुकीतून गब्बर यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली. दोघेही पसार झाले. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.

    पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांना हल्लेखोरांना हुडकून काढण्याचे निर्देश दिले. निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, उपनिरीक्षक वाघ, चंद्रशेखर घडेकर, हेडकॉन्स्टेबल भगत, मयूर ढेकले, गजेंद्र चौधरी, रंजित जाधव, सुमित बांगडे, आशुतोष यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

    गब्बर यांनी अमोल याला निवडणुकीत पराभूत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अमोलभोवती जाळे विणले. अमोल याने सुपारी दिल्याचे कळताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर कार्तिक व लक्ष्मणला अटक केली. तिघांना उमरेड पोलिसांच्या स्वाधीन केले. अमोलविरुद्ध अवैध दारूविक्री, देहव्यापारासाठी अपहरण करण्याचे गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण याच्याविरुद्धही बेला पोलिस ठाण्यात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *