• Sat. Sep 21st, 2024

‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल

‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही उलाढाल झाली. यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अयोध्येत सोमवार, २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साह असताना मुंबईनगरीदेखील सजली आहे. त्याअंतर्गत जागोजागी मंदिरे सजविण्यात आली आहेत, तर अनेक वस्त्यांमध्ये झेंडे, पताका, तोरण लावण्यात आली आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या भागांत रथयात्रा, यज्ञ, होमहवन होत आहेत. यांत सहभागी होणाऱ्या भक्तांकडून पारंपरिक वेषभूषा खरेदी करण्यात आली. या सर्व माध्यमातून मोठी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘सर्वाधिक मागणी कापडाचे तोरण, श्रीरामाचे चित्र असलेले भगवे तोरण व भगव्या पताकांना आहे. मागील तीन दिवसांत ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्याआधी भगव्या आणि पिवळ्या रंगाचे कुर्ते, पारंपरिक कपडे खरेदी करून यासंबंधीच्या सोहळ्यांमध्ये नागरिक सहभागी होत होते. त्यामुळे त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. परिणामी मुंबईतील वस्त्रद्योगाकडे भरमसाठ काम आले. एकप्रकारे या वस्त्रोद्योगाला संजीवनी मिळाली’, असे याबाबत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

सर्वच क्षेत्रांत मोठी उलाढाल

या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांत उलाढाल झाली आहे. प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या चांदीच्या नाण्यांना मागणी सध्या मोठी आहे. अनेकांनी २२ जानेवारीला चांदीच्या नाण्यांची खरेदी करण्यासाठी बुकिंग करून ठेवले आहे. त्या क्षेत्रातील उलाढाल १९ लाख रुपयांच्या घरात आहे. त्याखेरीज श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती, शुभेच्छापत्र, मोठमोठे कटआऊट तयार करण्याच्या क्षेत्रातील उलाढाल वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई-अयोध्या विमान, तिकीट १० हजारांपुढे

राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विमानसेवा कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाण सुरू केले आहे. मुंबईकरांनी यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे एरवी चार हजार रुपयांच्या घरात असलेले विमान तिकीट आता १० हजार रुपयांवर गेले आहे.

मुंबईहून सध्या केवळ इंडिगो एअरलाइन्सची सेवा सुरू आहे. ती १५ जानेवारीला सुरू झाली. शनिवारपर्यंतचे या सेवेचे तिकीट चार हजार रुपयांच्या घरात होते. सोमवारचे तिकीट मात्र ११ हजार ४९९ रुपयांपर्यंत पोहोचले. मंगळवारचे तिकीट आठ हजार ३५० रुपये आहे. मात्र त्यानंतर सलग हे तिकीट १० हजार रुपयांच्यापुढे आहे. २६ जानेवारीला सुट्टीच्या निमित्ताने अनेकांनी अयोध्येला जाण्याचे नियोजन केल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामी तिकीट दर वाढले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे तिकीट दरदेखील सहा हजार रुपयांहून अधिक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed