माझ्यावर केलेले आरोप सगळे चुकीचे आहेत. राजकीय कारणांतून माझ्यावर केले गेलेत, त्याच कारणातून माझी चौकशी केली जात आहे. मी शिंदे गटासोबत आलो नाही, म्हणून तुम्ही राग काढला असेल, हे मी समजू शकतो. पण त्यासाठी माझ्यावर राग काढा, मला अटक करा, जेलमध्ये टाका पण माझ्या पत्नी आणि मुलाला का त्रास देता? असा भावनिक सवालही त्यांनी केला.
“पुढील कारवाईसाठी आपण सामोरे जाणार असून आपण अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात वगैरे जाणार नाही. जी काही कारवाई होईल त्याला आपण सामोरे जाऊ, असं आमदार राजेश साळवी यांनी स्पष्ट केलं. आपली पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाला आहे, ते सध्या कुठे आहेत? असं पत्रकारांनी आमदार साळवी यांना विचारल्यावर ते म्हणाले की, “२३ जानेवारी रोजी बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचे साहित्य आणण्यासाठी माझी पत्नी मुंबईला गेली आहे. ती उद्या सकाळी येईल”.
मी कोणतीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी मी कुठेही अर्ज करणार नाही. मला घेऊन जाऊन देत. कोर्टात पुरावे सादर करू दे. माझा न्याय देवतेवरती विश्वास आहे की न्यायदेवता मला आरोपांतून मुक्त करेल, असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला आहे.
आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर रत्नागिरी येथील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मिंधे सरकार चोर है अशा जोरदार घोषणा देत शिवसेना नेते विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नावानेही घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते राजन साळवी यांच्या कारवाईनंतर आक्रमक झाले आहेत.
दरम्यान आता सायंकाळी उशीरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभराची चौकशी पूर्ण झाली आहे. अखेर सायंकाळी साडे सातवाजता ही कारवाई संपली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी काही कागदपत्रे घेऊन आज परतले व आजची कारवाई पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.