• Sat. Sep 21st, 2024
‘लग्न करीन, तर तुझ्यासोबतच करीन’, तगादा लावणाऱ्या प्रेयसीला पुण्यात संपवलं; नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तिचा खदानीत ढकलून खून केला. ही घटना नऊ जानेवारी रोजी खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडली.

देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय २७, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मृत महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे २०१०पासून प्रेमसंबंध होते. महिलेचे २०१८मध्ये लग्न झाले. मात्र, पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी ती माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर तिचे देवेंद्रकुमार याच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान, देवेंद्रकुमारची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली. ही बाब महिलेला समजली असता तिने ‘लग्न करीन, तर तुझ्यासोबतच करीन, तुझ्यासोबतच राहीन,’ असा तगादा देवेंद्रकुमारकडे तगादा लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमारने तिला बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीत तिला उंचावरून ढकलले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

‘अटल सेतू’चा वापर सहल अन् मौजमजेसाठी, जीव धोक्यात घालून फोटोशूट, बेशिस्तांवर कारवाईची मागणी
निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

‘लाउन जॉब पार्ट कंपनी’च्या गोडाउनमधून क्रेन बाहेर घेत असताना विजेच्या तारेला जॉब पार्टचा स्पर्श झाल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना चार मार्च २०२३ रोजी दुपारी तळवडे येथील ‘अतुल इंडस्ट्रीज प्रिमायसेस’मध्ये घडली.

जीलाजित प्रेमबहादूर गौतम (वय २३) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. क्रेनचालक आलोक कुमार महतो (वय ३३, रा. तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेमंत इंडस्ट्रीज येथे सात ते आठ टन वजनाचा चौकोनी आकाराचा ब्रॉयलर प्रेशर पार्ट गोडाउनमधून बाहेर काढून गाडीमध्ये लोड करीत असताना क्रेनचालकाच्या हलगर्जीपणामुळे विजेच्या तारांना पार्टचा धक्का लागला. तारांमधील वीजपुरवठा जॉबमध्ये उतरला. जीलाजित जॉब पार्ट धरून उभा असल्याने त्याला विजेचा धक्का लागला अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

जाब विचारल्याने मित्राला मारहाण

जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने हॉटेलमधील ग्लास फोडल्याचा जाब विचारला असता त्याने मित्राच्याच डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चाकण येथील ‘मैफिल’ हॉटेलसमोर घडली.

विकास किसन सरोज (वय १८, रा. राजगुरुनगर, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी समीर उत्तम काशीद (वय २०, रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समीर आणि विकास हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. त्या वेळी विकासने काचेचे ग्लास फोडले. त्यामुळे समीर यांनी विकासला ‘तू ग्लास का फोडले,’ अशी विचारणा केली. त्यावरून विकासने समीर यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तेथे पडलेली बिअरची बाटली फोडून त्यांना जखमी केले. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

शोरूमची फसवणूक

कारच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या कन्सलटंटने वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ग्राहकाकडून पैसे स्वीकारून त्याचा अपहार केला; तसेच ग्राहकाला गाडीची परस्पर डिलिव्हरी देऊन फसवणूक केली. हा प्रकार २१ जुलै ते दोन ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘बी. यू. भंडारी’ शोरूम, वाकड येथे घडला.

राहुल दत्तात्रय खांदवे (वय ४७, रा. थेरगाव) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिरीष विजय भालशंकर (वय ३२, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीष वाकड येथील शोरूममध्ये सेल्स कन्सलटंट म्हणून काम करतो. त्याने ग्राहकाला ‘एमजी ग्लोस्टर’ कार विकली. ग्राहकाने त्याचे ४३ लाख २४ हजार रुपये दिले. उर्वरित चार लाख ८४ हजार १९१ रुपये ग्राहकाकडे राहिले होते. शोरूमच्या वतीने फिर्यादींनी ग्राहकाकडे विचारणा केली असता शिरीषने पाच लाख रुपये रोख स्वरूपात घेतले असून, कारची डिलिव्हरीदेखील दिल्याचे समजले. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

२५ किलो गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रावेत येथे २५ किलो गांजा पकडला. यामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री म्हस्के वस्ती, रावेत येथे करण्यात आली.

कृष्णा मारुती शिंदे (वय २७, रा. शिंदेवस्ती, शितपूर, ता. कर्जत, जि. नगर), अक्षय बारकू मोरे (वय २९, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत, जि. नगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय ३५, रा. कुसडगाव, ता. जामखेड, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रावेत परिसरातील म्हस्के वस्ती येथे बीआरटी रोडच्या बाजूला तिघे जण संशयितपणे थांबले असून, त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५ लाख ६९ हजार १०० रुपयांचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, कार, चार मोबाइल आणि १६०० रुपये रोख रक्कम असा एकूण ३० लाख ५५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

हा गांजा वसंत डुकळे (रा. आंबी, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याकडून आणल्याचे चौकशीत समोर आले. सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला आरोपी गांजा विकणार असल्याचे तपासात समोर आल्याने वसंत आणि सौरव यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलिस तपास करीत आहेत.

संक्रांतीमुळे भाज्या कडाडल्या, वांगी- गाजर- मटार या भाज्यांना मोठी मागणी, जाणून घ्या ताजे दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed