अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे. राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. त्याचवेळी मंदिर होण्यासाठी ज्या कारसेवकांनी कष्ट घेतले. स्वप्न पाहिले. ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होत आहे. त्या कारसेवकांसाठी महाराष्ट्रभर आरत्यांसह जे जे चांगले उपक्रम राबवता येतील ते राबवा, असे आवाहन राज यांनी यावेळी केले.
राम मंदिराच्या शिलान्यासासंदर्भात कोणतेही चांगले उपक्रम राबविताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही राज यांनी कार्यकर्त्यांना केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हाध्यक्षांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी राज बोलत होते. व्यासपीठावर बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजू उंबरकर आदी उपस्थित होते.
स्वप्न पाहू नका
‘तुम्ही ज्या भागात राहता तेथील प्रश्न तुम्हाला माहिती आहे. ते प्रश्न कसे सोडावयचे हे ही तुम्हाला माहिती आहे. राजकारणाच्या पहिल्या टप्प्यावर तुम्ही पाऊल ठेवले आहे. सध्या सरपंच आहात. उद्या जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार व्हाल. म्हणजे आतापासून स्वप्न पाहू नका,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
गाव, परिसर स्वच्छ ठेवा
‘तुम्ही हुशार, प्रामाणिक आहात. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही उत्सुक, इच्छुक आहात. तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. फक्त गाव स्वच्छ ठेवा, एवढेच मला सांगायचे आहे. आपल्या आजूनबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही. इच्छाशक्ती लागते. जेवढे तुम्ही गाव, परिसर स्वच्छ ठेवाल तेवढे तुम्ही रोगराईमुक्त व्हाल. गावामध्ये छान वाटले पाहिजे. अस्वच्छ वातावरणामुळे तुमचे मनही अस्वच्छ होते. तुम्हाला असेच अस्वच्छ राहते. तुम्हाला जगण्याची उर्मी ही कमी होते,’ असे सांगत राज यांनी पदाधिकाऱ्यांना गावे स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मनसेचा झेंडा उखाडू शकत नाही
ज्यांनी मतदान केले नसेल त्यांच्यावर सूड उगवू नका. त्यांनाही वाटले पाहिजे आपण यांना मतदान करायला हवे होते. त्यावेळी तुम्हाला त्या भागातून कोणीही हात लावू शळकणार नाही. मनसेचा झेंडा कोमी उखडू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करायला राज विसरले नाहीत.
पाच लाख देणार
मनसेच्या हाती ग्रामपंचायती असलेल्या गावांमध्ये गाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या बैठक घ्या. मनसेच्या हाती असलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वोत्कृष्ट स्वच्छ गावांमध्ये येऊन मी पाच लाखांचा निधी देईन. कमी वाटले तर जास्त देईन आणि देईनच, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. त्यावेळी, ‘पुणे शहरासाठी आज ५० हजार कोटी रुपये जाहीर करत आहे,’ अशा घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर राज यांनी टीका केली.
कार्यकर्ते ‘उत्साही’ अन् ‘आजारी’ राज
भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मला यायला उशीर झाला, यापेक्षा खरे तर येऊच शकत नव्हतो. काल संध्याकाळपासून मला ताप आल्यासारखे वाटत होते. सकाळी उठल्यानंतर डोळे उघडत नव्हते. आताही अशक्तपणा अंगात आहे. पण तुम्ही इतक्या लांबून आला आहात. तुमचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईत परतणार नाही. म्हणून पाच दहा मिनिटे तुमच्याशी बोलायला आलो आहे,’ असे सांगत राज यांनी आपण आजारी असल्याचे सांगून टाकले. त्यामुळे कित्येक तास राज यांचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झालेल्या कार्यकर्त्यांना अवघी काही मिनिटेच आपल्या नेत्याचे शब्द ऐकायला मिळाल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली.