• Sun. Jun 14th, 2026

    Konkan Railway: कोकणवासी पुन्हा वाऱ्यावर! ‘दादर-रत्नगिरी पॅसेंजर’ऐवजी गोरखपूरसाठी एक्सप्रेस सुरू; प्रवाशांमध्ये संताप

    Konkan Railway: कोकणवासी पुन्हा वाऱ्यावर! ‘दादर-रत्नगिरी पॅसेंजर’ऐवजी गोरखपूरसाठी एक्सप्रेस सुरू; प्रवाशांमध्ये संताप

    Dadar-Ratnagiri Express: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी वर्षानुवर्ष कोकणवासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. कोरोनो काळात बंद झालेली दादर-रत्नागिरी गाडी आता परत सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी कायमची बंद करून त्या ठिकाणी आता उत्तर प्रदेशात जाणारी दादर गोरखपुर एक्सप्रेस सोडण्यात आल्याने कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोरोना कालावधीत ‘दादर-रत्नागिरी’ ही गाडी बंद करून ती ‘दिवा-रत्नागिरी पॅसेंजर’ म्हणून सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही गाडी सुरू करण्यासाठी कोकणातील प्रवाशांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र कोकणवासियांच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका खासदारांना दिलेल्या पत्रात दादर-गोरखपुर गाडी नियमित स्वरूपात करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

    कोरोना काळात एक्सप्रेस बंद

    मुंबईतील दादरवरून रत्नागिरी मध्ये येण्यासाठी ही एकमेव गाडी सुरू होती ती कोरोना कालावधीत बंद करण्यात आली तेव्हापासून ती गाडी आजवर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र दादर रत्नागिरी गाडी अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. दादर-रत्नागिरी गाडीला मोठी मागणी आहे मात्र या मागणीची दखल अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतलेले नाही. सध्या त्याऐवजी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सोडण्यात येते. पण दादर हे मुंबईच्या केंद्रस्थानी असून या स्थानकावर पोहोचणे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोपं आहे.

    दादर रत्नागिरी गाडी ज्या वेळेला बंद करण्यात आली त्यावेळेला लोकल गाड्यांना अडथळा होत असल्याचे प्राथमिक कारण देण्यात आलं होतं. खासदार रविशंकर शुक्ला यांना दिलेल्या पत्रात दादर गोरखपुर ही गाडी आता नियमित स्वरूपात करण्यात आल्याचे स्पष्ट झाल आहे. यापूर्वी ही गाडी हंगामी स्वरूपात चालवली जात होती. महाराष्ट्रातील गाड्यांना दादर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही किंवा कोणत्याही तांत्रिक कारण देत कोकणात येणारी गाडी बंद करण्यात आली मात्र महाराष्ट्र बाहेर उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाडीला वाट करून देण्यात येत असल्याने कोकणवासियांमध्ये नाराजी असल्याचं मत रेल्वेचे अभ्यासक अक्षय महाबदी यांनी व्यक्त केल.

    दादर-रत्नागिरी सेवा बंद करण्यामागचं कारण काय?

    मिड डमधील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अक्लेकर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये या मागील कारण स्पष्ट केलं आहे. मध्ये रेल्वेवर दादर-रत्नागिरी एक्सप्रेस चालवताना एक ऑपरेशनल अडचण येते. कोकणातून येणारी ही एक्सप्रेस जेव्हा दिवा आणि विद्याविहार स्थानकांजवळ मुंबईतील उपनगरिय रेल्वे मार्गांवर प्रवेश करते तेव्हा एकाच वेळी सुमारे सहा लोकल थांबतात. अप आणि डॉऊन या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी तीन लोकल थांबवल्या जातात. यामुळे लोकलचं वेळापत्रक विसकळीत होतं. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा