मुंबई
मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगाने कारवाई करत १२ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी अत्यंत कुशल आणि तत्पर तपास केला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तातडीने गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्यात आला आणि संबंधित आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचे समोर आले असून, त्यातील काही ऑपरेटिव्ह परदेशातून कार्यरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एका प्रमुख आरोपीच्या भावालाही अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी सध्या परदेशात असल्याने त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
