नाशिकमध्ये शुक्रवारी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मोदीजी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये भूकंप आला. आता आपल्या देशाकडे वाइट नजरेने पाहण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही आणि हे फक्त आपल्या पंतप्रधानांमुळेच शक्य झाले आहे, मोदींमुळे आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात गाजत आहे, असे गौरवोद्गारही शिंदेंनी काढले.
मुख्यमंत्री उवाच्…
-आज जगात आदराने घेतले जाते पंतप्रधान मोदींचे नाव
-मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था पोहोचली तिसऱ्या क्रमांकावर
-मोदी दूरदृष्टीचे नेते; ५०-६० वर्षांतील विकासापेक्षा दहा वर्षांत अधिक विकास
-जी-२० अन् चांद्रयान अभियानही झालेय यशस्वी
-मोदींना काही जागतिक नेते बॉस म्हणतात, तर काही मोदींसोबत सेल्फी काढतात
-श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत पंतप्रधान आले ही आनंदाची बाब
-राष्ट्रीय युवक महोत्सव आयोजनाची संधी हे आमचे सौभाग्य
‘तरुण देशाचे भवितव्य’
भारत तरुणांचा देश आहे. आजमितीस देशात २५ कोटी तरुण आहेत. त्यामुळे पुढील २५ वर्षे तरुणांनी राष्ट्रहितासाठी योगदान दिले पाहिजे. तरुण हे देशाचे भवितव्य असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले. तरुणांमुळे आज सर्व ठिकाणी भारताचे नाव गाजत आहे. राज्य सरकारने तरुणांसाठी विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वामी विवेकानंद तरुणांसाठी प्रेरणास्रोत राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.