सौ.रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सौ. रजनीदेवी पाटील यांचा २६ जुलै १९४८ रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटुंबातील आहे. १६ मे १९६८ रोजी त्यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकिय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रोत्साहन देणाऱ्या ‘माई’
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सौ.पाटील यांना सर्वजण ‘माई’ या नावाने ओळखत असत. आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. त्या उच्चशिक्षित असूनदेखील जुन्या रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाशी त्या अत्यंत आपुलकीने वागत असत. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे.