• Mon. Nov 25th, 2024

    ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?

    ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?

    नाशिक: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्याला अवघे ११ दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. आज मोदींनी नाशिकचा दौरा केला. रोड शो करत लोकांना अभिवादन केलं. रामकुंडात पूजा-अर्चा केली. त्यांनी काळाराम मंदिराला भेट दिली.

    प्रभू राम यांना १४ वर्षे वनवास सोसावा लागला. या कालावधीतील काही काळ ते नाशकात थांबले होते असं मानलं जातं. प्रभू राम, सीतामाई आणि बंधू लक्ष्मण काही काळ इथे थांबले होते. त्यामुळे नाशकाला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमीही म्हटलं जातं. काळाराम मंदिराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या या मंदिराचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळेच मोदींनी या मंदिराला भेट दिली.

    २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होईल. त्या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आपण त्या दिवशी काळाराम मंदिरात जाणार असल्याचं ठाकरेंनी आधीच जाहीर केलं होतं. आज त्याच मंदिराला मोदींनी भेट दिली. मंदिराच्या आवारात झाडू मारला. या माध्यमातून मोदींनी ठाकरेंच्या प्लानवर आधीच झाडू फिरवल्याची चर्चा आहे.
    अटल सेतुमुळे प्रवास होणार सुपरफास्ट; पण पूल संपताच सहन करावा लागणार मनस्ताप, कारण काय?
    पूर्वी मंदिरात भेदभाव मानला जायचा. काही समाज घटकांना मंदिरात प्रवेश नसायचा. त्याविरोधात १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजींनी दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं. त्यानंतर पश्चिम भारतात अशी प्रकारच्या आंदोलनांनी जोर धरला. काळाराम मंदिर याच कारणांमुळे सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे.

    काळाराम मंदिराचं महत्त्व लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी २२ जानेवारीला याच मंदिराला भेट देण्याची योजना आखली. आज मोदींनी त्याच मंदिराला भेट दिली. २३ जानेवारीला उद्धव ठाकरे नाशकात रॅली करणार आहेत. पण मोदींनी आजच नाशकात धार्मिक कार्यक्रम केला. आपण ११ दिवस खास विधी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे आणि काळाराम मंदिराच्या भेटीमुळे ठाकरेंच्या प्लानवर पाणी फिरल्यात जमा आहे.

    हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगितली. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. उद्धव ठाकरे त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मांडत आहेत. त्यामुळेच सामाजिक महत्त्व असलेल्या काळाराम मंदिराला भेट देण्याची तयारी ठाकरेंकडून करण्यात आली. पण मोदींनी १० दिवस आधीच नाशिकचा दौरा करत मंदिराला भेट दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *