• Sun. Sep 22nd, 2024

कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधुनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवत – केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया

ByMH LIVE NEWS

Jan 12, 2024
कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधुनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवत – केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : कोल्हापूर मधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात आधुनिक आणि आवश्यक सुविधा असणाऱ्या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल. विमानतळावर प्रवेशद्वार व आतील भिंती येथील संस्कृतीचे दर्शन घडवतील अशा प्रकारे तयार करण्यात येत असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिली.

जोतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर येथे विमानतळ पाहणी व विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आले आहेत. यावेळी त्यांनी नवीन विमानतळ इमारतीच्या कामांची आतून व बाहेरून पाहणी केली व आवश्यक सूचना विमानतळ प्रशासनाला दिल्या. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या रुबिना अली, सह सचिव भारतीय विमानतळ प्राधिकरण दिलीप साजणानी, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इंजिनिअरिंग अनिल हरिभाऊ शिंदे कोल्हापूर विमानतळ संचालक, प्रशांत वैद्य इंजनीअरिंग इन चार्ज, प्रकाश दुबल, संयुक्त महाप्रबंधक विद्युत, सिद्धार्थ भस्मे उप महाप्रबंधक सिव्हिल यांचेसह विमानतळ प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्यांनी इमारतीच्या आतील पाहणी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात सर्व भिंतींवर लावण्याचे निर्देश दिले. तसेच आलेल्या नवीन प्रवाशांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन लावण्याच्या सूचना केल्या. स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र व इतर कलाकृतींची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांनी आरक्षण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, प्रवाशांसाठी असणारा आराम कक्ष, आरक्षित असणारा व्हिआयपी कक्ष तसेच इतर सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले, देशाची अर्थिकच नाही तर आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रगतीही झाली आहे. देशाच्या मेट्रो शहरांबरोबरच उर्वरीत महत्त्वाच्या शहरांमधे जागोजागी विमान सेवा सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विमानतळावर आल्यावर पाहायला मिळेल. मुंबई, बंगलोर व हैद्राबाद या प्रमुख तीन शहरांना अखंड स्वरूपात कोल्हापूर जोडले जाणार आहे. लवकरच पूर्ण होणा-या या विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील बैठकीत निर्णय घेवून घोषणा करू.

40 हजार चौरस फुट असणा-या या विमानतळावर 500 प्रवाश्यांची दैनंदिन येजा राहील. 5 लक्ष प्रवाशांना वार्षिक सेवा देण्याची क्षमता या विमानतळाची असणार आहे. पूर्वी लहान धावपट्टी होती आता 1780 मीटरची केली आहे. भविष्यात टप्पा 2 मधे ती 2300 मीटरची करू. त्यासाठी अजून 65 एकर जमीन राज्य शासनाकडून हवी आहे. कार्गो सेवाही सुरू करण्याचा विचार आहे. येत्या काळात तेही काम जोमाने करू.

विमानतळाचे काम पूर्ण झाले असून थोडेच काम बाकी आहे. येत्या काही दिवसात तारिख निश्चित झाल्यानंतर भव्य लोकार्पण करू असे ते यावेळी म्हणाले. दिड वर्षापूर्वी आम्ही नियोजन करताना फक्त काचेची इमारत करायची नाही असे नियोजन केले. यात मराठी इतिहास आणि संस्कृती, मराठा इतिहासातील वाडा पद्धतीच्या काळ्या दगडातील वास्तू निर्माण करून विमानतळ उभारण्याची कल्पना होती. अशाच प्रकारे दगडी बांधकामात, मशाली लावलेल्या स्वरूपात किल्ल्यांप्रमाणे आज विमानतळ आपणाला पाहायला मिळत आहे याचा निश्चितच स्थानिकांना आनंद मिळेल असे ते यावेळी म्हणाले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed