• Sat. Sep 21st, 2024

अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही

अयोध्येत श्रीरामाला तुमची नावे कळविणार, खासदार विखेंची मिश्किल दमबाजी; जाहीर केली वेगळी स्पर्धाही

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना स्वखर्चाने दाळ व साखर वाटप केले आहे. यापासून २२ जानेवारीला लाडू तयार करावेत आणि अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनंतर आपल्या गावातील मंदिरात नैवद्य दाखवावा, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.

आवाहन करून झाल्यानंतर विखे पाटील यांनी आता मिश्किलपणे नागरिकांना दमही भरला आहे. या दाळीपासून लाडू केली की नाही, याची आमची यंत्रणा खात्री करणार आहे. जे नागरिक लाडू तयार करणार नाहीत, त्यांची यादी करून मी अयोध्येत श्रीराममाच्या चरणी ठेवून विनंती करणार की देवा आता तुम्हीच काय ते पहा. विखे पाटील यांच्या या मिश्किल टिपणीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर त्याच वेळी विखे पाटील यांनी स्पर्धाही जाहीर केली आहे. २२ जानेवारीला श्रीरामाच्या स्वागतासाठी उत्कृष्ट उपक्रम करणाऱ्या प्रत्येक वॉर्डातील एका विजेत्या नागरिकाना सहकुटुंब विमानाने अयोध्या दर्शन घडवून आणण्यात येणार आहे.

खासदार डॉ. विखे पाटील परिवाराकडून नगर जिल्ह्यात मोफत साखर आणि दाळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. नगर शहरातील एका प्रभागात हा कार्यक्रम होता. त्यावेळी विखे पाटील यांनी नगर शहरातील नागरिकांसाठी एक बक्षीस योजना जाहीर केली. ‘मेरे घर आए राम’ असे नाव स्पर्धेला देण्यात आले आहे. २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्तीची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. यासाठी व्हाॅट्सअप क्रमांक देण्यात येईल. यातून प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढले जातील. स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घडविणार आहे.

स्पर्धेची घोषणा करतानाचा विखे पाटील यांनी वाटप केलेल्या दाळ आणि साखरेपासून लाडू तयार करण्याचा अग्रही लावून धरणा. त्यासाठी आपल्या खास शैलीत मिश्लिकलपणे दमही भरला. ते म्हणाले, आम्ही वाटलेल्या दाळ-साखरपासून लाडू तयार केले की नाही, हे तापसण्यासाठी आमची यंत्रणा येईल. सर्वांना माहितीच आहे की, देशात आणि नगर जिल्ह्यात विखे यंत्रणा कशी आहे ते. जो कोणी लाडूचा प्रसाद बनवणार नाही, त्याची यादी तयार केली जाईल. मी ती अयोध्याला घेऊन जाणार आहे. तेथे ती प्रभू श्रीरामाच्या चरणी ठेवणार आणि सांगणार की हे प्रभू श्रीरामा यांनी साखर अन् दाळ घेऊन देखील प्रसादाचा लाडू बनवला नाही, यांचा बंदोबस्त काय करायचा तो तूच कर, असे सांगणार आहे, विखे पाटील यांच्या या मिश्किल दमबाजीवर एकच हशा पिकला.

यावेळी भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, माजी उपमहापौर मालन ढोणे, ज्ञानेश्वर काळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed