• Mon. Nov 25th, 2024
    नगरचे मराठे एकवटणार, घरची चूल बंद ठेवून बांधवांच्या सेवेसाठी हजर होणार

    अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारी पदयात्रा नगर जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचा नगर शहराजवळ मुक्काम असून यामध्ये सहभागी होणाऱ्या लाखो आंदोलकांच्या सेवेची जबाबदारी जिल्ह्यातील मराठा समाजाने घेतली आहे. सर्व तालुक्यांतून मराठा बांधव आपल्या घरच्या चुली बंद ठेवून नगरला येणार असून मुंबईला निघालेल्या आंदोलनांच्या सेवेत रुजू होणार आहे. शिवाय मुंबईकडे जाणाऱ्या पदयात्रेतही नगरहून मोठ्या संख्येने आंदोलक जाणार आहेत. याचे नियोजन मंगळवारी नगरला झालेल्या बैठकीत करण्यात आले.

    मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या गावापासून २० जानेवारी रोजी पदयात्रा काढणार आहेत. ही पदयात्रा जालना, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातून पुणे मार्गे मुंबई येथे आझाद मैदानावर पोहोचणार आहे. ही पदयात्रा बीड जिल्ह्यातून गेवराई मार्गे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पाथर्डीमार्गे ही पदयात्रा अहमदनगर शहरातून जाणार आहे.

    त्यासाठी नगर शहरात आज सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजनाची बैठक घेण्यात आली. कोहिनूर मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली. नगर जिल्ह्यात या यात्रेचे स्वागत आणि त्यासोबत येणाऱ्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण १४ तालुक्यातून सर्व मराठा बांधव अहमदनगर शहरात या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

    या पदयात्रेत सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी सर्व १४ तालुक्यातील मराठा बांधव नगर शहरात उपस्थित राहणार आहेत. सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत जालना, बीड आणि इतर जिल्ह्यातून या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांची सेवा करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये नगर जिल्ह्यातील प्रतेक तालुक्यामधील मराठा बांधवांनी एक लाख लोक जेवतील असे नियोजन हाती घेतले आहे. जेवण, राहण्याची सोय, पाणी व इतर काही गोष्टींबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    नगर शहरातून पुणे हद्दीपर्यंत ही पदयात्रा जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव या पदयात्रेतील मराठा बांधवांची सेवा करणार आहेत. तर अनेक मराठा बांधव पुढे मुंबईकडे जाणाऱ्या या पदयात्रेत सामील होणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed