• Sat. Sep 21st, 2024

काहींचा हट्टीपणा ८४ वयानंतरही कायम, निवृत्ती घेत नाहीत; अजितदादांचा शरद पवारांना खोचक टोला

काहींचा हट्टीपणा ८४ वयानंतरही कायम, निवृत्ती घेत नाहीत; अजितदादांचा शरद पवारांना खोचक टोला

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ‘सरकारमध्ये काम करणारे ५८पासून ७५पर्यंतच्या वयात निवृत्ती घेतात; मात्र काहीजण ८४ वर्षे उलटली तरी थांबण्याचे नाव काढत नाहीत. आम्हालाही लोकांसाठी चांगले निर्णय घेता येतात, हे आम्ही सिद्ध केले आहे. मात्र काही जण ऐकत नाहीत; हट्टीपणा करत राहतात’, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता रविवारी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणच्या वरप येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा वाचाळवीर असा उल्लेख करताना आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ‘कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. मी लाभासाठी नव्हे, तर बहुजनाच्या कल्याणासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहे’, असे पवार यांनी नमूद केले. कल्याण जिल्हा घोषित करण्याची मागणी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी, ग्रामीण भागातील ७० ग्रामपंचायतींचे वेगाने नागरीकरण होत असल्याने याची स्वतंत्र नगरपरिषद घोषित करण्याची मागणी केली. उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवून आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे संकेत दिले.

बच्चा म्हणत अजितदादांची पुतण्यावर टीका; रोहित पवारांचे हटके प्रत्युत्तर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले…

‘मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुंडगिरीत वाढ’

‘ठाणे जिल्ह्यात गुंडगिरी वाढत आहे. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे, गुंडगिरी आवरावी’ असे आदेश उपमुख्यमंत्री या नात्याने देत असल्याचे अजित पवार यांनी भाषणात नमूद केले. यामुळे मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे पवार यांनी घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली.

कल्याणमध्ये शक्तिप्रदर्शन

रस्त्याच्या कडेला उभ्या बुलडोझरमधून पुष्पवृष्टी, क्रेनवर लटकणारे हार, जागोजागी कार्यकर्त्यांची गर्दी आणि समर्थकांच्या गराड्यातून अजित पवार यांनी कल्याण शहरात शक्तिप्रदर्शन केले. ठाण्याच्या ग्रामीण भागातून यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा ताफा कल्याणमध्ये दाखल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed