मिळालेल्या माहितीनुसार, गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगरमध्ये राहतात. त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती-पत्नी जळगावातील कोल्हे नगरमध्ये जात होते. यादरम्यान वाटेत राष्ट्रीय महामार्गावर आयटीआयजवळ गुणवंत पाटील यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दुचाकीवरील गुणवंत व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघे जमिनीवर पडले. घटनेनंतर महामार्गावरुन ये जा करणाऱ्या काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.
तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र तोपर्यंत पुष्पा पाटील यांनी जगाचा निरोप घेतला होता. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्पा पाटील यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गुणवंत पाटील यांना मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची बाब काही वेळासाठी त्यांच्याकडून लपविण्यात आली होती.
गुणवंत हे वारंवार पत्नी कुठे आहे, कशी आहे अशी विचारणा करत होते. पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच गुणवंत पाटील यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तर दुसरीकडे ज्या पुतण्याला पाहण्यासाठी निघाले त्या पुतण्याला पाहण्यापूर्वीच हा अपघात झाल्याने त्याठिकाणचेही सर्व नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.