रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीत या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांचे ब्रेक स्वयंचलित कार्यान्वित होऊन त्यामुळे अपघात टाळणे शक्य होणार आहे.
‘कवच’ची सद्यस्थिती
– पश्चिम रेल्वेने २०२२मध्ये ९० रेल्वे इंजिनसह ७३५ किमीवर ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
– विरार-सूरत-वडोदरा विभागात ३३६ किमी, वडोदरा-अहमदाबाद विभागात ९६ किमी आणि वडोदरा-रतलाम-नागदामध्ये ३०३ किमीवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
– विरार-नागदादरम्यान १४३ किमीवर ‘कवच’ कार्यान्वित करण्यात आले आहे.
– १५ जानेवारीपर्यंत आणखी १०० किमी आणि संपूर्ण मार्गावर जून २०२४अखेर ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
– सध्या ९०पैकी एकूण ३४ रेल्वे इंजिनवर ‘कवच’ कार्यान्वित आहे.
असे करते ‘कवच’ काम
– रेल्वेच्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) ‘कवच’ संरक्षण यंत्रणा विकसित केली आहे.
– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मार्च २०२२मध्ये सिकंदराबाद येथे कवच कार्यप्रणालीची चाचणी करण्यात आली.
– चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिची भारतीय रेल्वेत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
– इंजिनच्या लोको पायलटने सिग्नल ओलांडला, अतिवेगाने गाडी चालवल्यास ती कार्यान्वित होते.
– अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये (यूएचएफ) रेडिओ कम्युनिकेशनचा वापर यात केला जातो.
– ही इंटरलॉकिंगसह विद्यमान सिग्नल यंत्रणेला जोडली जाते.
– स्थानक उपकरणांसह रुळांच्या बाजूला लागणाऱ्या उपकरणांसाठी अंदाजे ५० लाख आणि इंजिनसाठी अंदाजे ७० लाख खर्च येतो.
Read Latest Maharashtra News And Marathi News