• Mon. Nov 25th, 2024

    राजे तुमच्यासाठी कायपण! ८२ वर्षांच्या आजीने सर केला शिवनेरी किल्ला, मुलाने केली इच्छा पूर्ण

    राजे तुमच्यासाठी कायपण! ८२ वर्षांच्या आजीने सर केला शिवनेरी किल्ला, मुलाने केली इच्छा पूर्ण

    पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द कानावर पडले की अनेकांच्या अंगावर शहारे येतात. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या आठवणाने ऊर अभिमानाने भरुन येतो. मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर, जन्मल्यापासून कानावर पडलेल्या त्यांच्या शौर्य गाथा, पण संसाराच्या रहाटगाड्यात त्यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा. ही इच्छा अखेर वयाच्या ८२ व्या वर्षी पूर्ण झाली. आश्चर्य वाटलं ना…पण हे खरं आहे. आंबेगाव तालुक्यातील एका ८२ वर्षीय आजींनी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरी हा सर केला आहे. या किल्ल्यावर येण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली.

    आंबेगाव तालुक्यातील असणाऱ्या नांदूर येथील ८२ वर्षांच्या पार्वताबाई मुरलीधर वायाळ या आजी आपल्या कुटुंबासोबत राहतात. आयुष्यभर त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची इच्छा मनात होती. मात्र, कामाच्या आणि संसाराच्या रहाटगाड्यात तिथपर्यंत जाता येत नव्हते. मात्र त्यांचा मुलगा हरिभाऊ वायाळ यांनी त्यांची ही इच्छा वयाच्या ८२ व्या वर्षी पूर्ण केली आहे.

    नौदल अधिकाऱ्यांच्या एपोलेट्सच्या डिझाईनमध्ये बदल; छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेशी खास नातं

    याबाबत पार्वताबाई वायाळ यांनी “मटा ऑनलाईन” बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला मी स्वतः चढून पार केला. त्यामुळे मला खूप समाधान वाटले. किल्ला सर करताना माझ्यात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली होती.

    शिवजन्मभूमीत शिवरायांचे सुवर्ण मंदिर, जगातील सर्वात मोठा पुतळाही उभारणार, शिवसेनेची घोषणा

    यावेळी हरिभाऊ वायाळ यांनी सांगितले की, माझ्या आईने यापूर्वी कधीही शिवनेरी किल्ला पाहिला नव्हता. मात्र, तिची इच्छा तिने माझ्याकडे व्यक्त केली आणि तिला मी शिवनेरी किल्ल्यावर घेऊन आलो. तिने स्वतः शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्या चढल्या आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक ऊर्जा पाहायला मिळाली असे वायाळ यांनी सांगितले. पार्वताबाई यांनी या वयात शिवनेरी किल्ला चढल्याचा उत्साह तरुणांना देखील लाजवणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नुसते कानावर जरी आले तरी अंगात उत्साह संचारतो. तोच उत्साह पार्वताबाई यांच्या अंगात संचारल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या कार्याला नक्कीच सलाम.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed