• Mon. Nov 25th, 2024

    कोल्हेंना चॅलेंज देताच दादांचा पठ्ठा सरसावला, शड्डू ठोकत म्हणाले- फक्त तिकीट द्या, धूळ चारू!

    कोल्हेंना चॅलेंज देताच दादांचा पठ्ठा सरसावला, शड्डू ठोकत म्हणाले- फक्त तिकीट द्या, धूळ चारू!

    पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले. माध्यमांसमोर अमोल कोल्हे यांच्या तक्रारींचा जणू पाढाच वाचला. मतदारसंघातील कामाबाबत अमोल कोल्हे हे निष्क्रिय असल्याचे दादांनी म्हटले. अजितदादांच्या याच दाव्याला आता माजी आमदार विलास लांडे यांनी अनुमोदन दिल्याचे पाहायला मिळत आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. निवडणूक जवळ आली की कुणाला संघर्षयात्रा तर कुणाला पदयात्रा सुचतेय. लोकशाहीत प्रत्येकाला अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे. पण ५ वर्षे मतदारसंघात लक्ष द्यायचं होतं, अशा शब्दात अजित पवार यांनी कोल्हेंवर टीका केली. अजितदादांच्या याच सुरात सूर मिसळून कोल्हेंविरोधात लढण्याची इच्छा दादा गटाचे नेते विलास लांडे यांनी बोलून दाखवली.

    विलास लांडे म्हणतात, तिकीट द्या-शब्द खरा करून दाखवतो!

    यावेळी माध्यमांशी बोलताना विलास लांडे म्हणाले की, शिरूर लोकसभासाठी अमोल कोल्हे यांच्याविरोधात आम्ही तगडा उमेदवार देणार असून तो उमेदवार जिंकून यावा, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेहनत करतील. मात्र तो उमेदवार कोण याबाबत अद्याप स्पष्टोक्ती मिळाली नसली तरी अजितदादांनी जर मला खासदारकीची संधी दिली तर मी लढेन आणि दादांचा शब्द खरा करून दाखवेन. यासाठी मी दादांशी चर्चा करणार आहे, असंही लांडे यांनी सांगितलं.

    अजितदादा म्हणाले, लोकसभेत पाडणार म्हणजे पाडणार, अमोल कोल्हे यांनीही शड्डू ठोकला, म्हणाले…

    कोल्हेंविरोधात दादांचा उमेदवार कोण?

    अजित पवार हे दोन दिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी शिरूर लोकसभेसाठी जय्यत तयारी केली असून या कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिलं. त्यामुळे कोल्हेंविरोधातील उमेदवार कोण हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघात लोकसभेसाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शिरूर लोकसभा कोणाला मिळणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. मात्र अजित पवारांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    अमोल कोल्हे माझ्याकडे येऊन राजीनामा देणार होते, अजित पवार यांचा दावा

    अमोल कोल्हे काय म्हणाले?

    दादा हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देणं, एवढा मी मोठा नेता नाहीये. मी एक साधा कार्यकर्ता आहे. पण मला जर शिरूरच्या रिंगणात उतरवलं तर १०० टक्के मी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढणार. शरद पवार यासंदर्भात जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. पण निवडणूक एक माध्यम आहे आणि सत्ता हे एक साधन आहे. जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मुल्ये या गोष्टीच्या बाजूने राहायचं, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना जशास तसं उत्तर दिलं.

    अजितदादांनी शिरुरसाठी दंड थोपटले, अमोल कोल्हे म्हणाले; जनता सुज्ञ, ती ठरवेल कोणाच्या बाजूने राहायचं…!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *