• Sat. Sep 21st, 2024

राजकारणासाठी मला झुकवत असाल तर तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही : सुषमा अंधारे

राजकारणासाठी मला झुकवत असाल तर तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही : सुषमा अंधारे

मुंबई: ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानपरिषदेच्या सभागृहात याची गंभीर दखल घेण्यात आली होती. या मुद्द्यावरुन भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरील चर्चेअंती सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला होता. त्यामुळे सुषमा अंधारे या सगळ्यावर काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर सुषमा अंधारे यांनी एका जाहीर पत्राद्वारे आपली भूमिका सविस्तरपणे मांडताना माफी मागण्यास नकार दिला आहे. माझ्याकडून एखादा गुन्हा घडला असता तर मी बिनशर्त माफी मागितली असती.पण पक्षीय राजकारणातील कुरघोडीचा भाग म्हणून कोणी मला झुकवू पाहत असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही. भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे, असे सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार का, हे पाहावे लागेल.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुरमु जी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहुत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे, असे सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे.

शिस्तीत रहा बेट्या उडू नको ज्यादा, मी अंगार-भंगार नाय रं… धमकी देणाऱ्या मोहित कंबोजांना अंधारेंचा इशारा

घटनात्मक पदाचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरुन आपल्यावर कारवाईचा इशारा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही सुषमा अंधारे यांनी पत्राच्या माध्यमातून काही रोखठोक सवाल विचारले आहेत. माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे. सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत. पण संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

मलिकांवर आरोप म्हणून महायुतीत नको, मग अजितदादांवरही आरोप, त्यांचा पाठिंबा घेताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? : अंधारे

त्यावेळी महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही. सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? महापुरुषांचा अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही असे दरेकर किंवा मुनगंटीवार किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळून सभागृहामध्ये गोंगाट करणारा प्रत्येक सदस्य त्यांनी ही भूमिका का घेतली नाही? की मग सभापती पदावरील व्यक्ती श्रीमती गोरे या छ. शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या पेक्षाही वरच्या स्तरावर आणि परमादरणीय आहेत का ? की जेणेकरून त्यांच्या संबंधाने नकळत निघालेला शब्द सुद्धा अपमान म्हणून गृहीत धरला जातो मात्र राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि स्वतः सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी भाजपला फटकारले आहे.

तसेच माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही. भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे, असे सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे.

देवयानी फरांदेंची भाषा सारखी बदलते, तुमची स्क्रिप्ट कोण लिहून देतं? | सुषमा अंधारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed