• Sat. Sep 21st, 2024
Pune News: पुण्यात नागरिकांसाठी एक नवी सुविधा, स्वच्छतागृहे एका ॲपवर, ॲप नेमके कशासाठी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह माहिती देणाऱ्या ‘टॉयलेट सेवा अॅप’च्या पुढील टप्प्याचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यामध्ये शहरातील ११८३ स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध असून, वापरकर्त्यांना त्यांचा अभिप्रायही नोंदवता येतो. दरम्यान, या अॅपच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ स्वच्छतागृहा’च्या २०२३नुसार, शहरात ‘स्वच्छ शौचालय स्पर्धा’ घेण्यात येणार आहे.

अॅपचे सादरीकरण आणि स्पर्धेची घोषणा पुणे महापालिकेचे ‘स्वच्छता ब्रँड अॅम्बॅसिडर’ प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अॅपचे निर्माते अमोल भिंगे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे उपस्थित होते. भिंगे यांच्यासारख्या अनिवासी भारतीयाने केलेले हे कार्य महत्त्वाचे असल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

हक्कभंगाच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंनी ठणकावून सांगितलं, ‘तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही’
शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा रस्त्यावरील वेळ वाढून स्वच्छतागृहांचा वापर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांना विशेषतः महिला आणि मुलांना स्वच्छ, वापरण्यास भीती न वाटणारी स्वच्छतागृहे उपलब्ध होणे आवश्यक आहे. आगामी काळात टॉयलेट सेवा अॅपवर नाट्यगृहांमधील स्वच्छतागृहेही समाविष्ट व्हावीत.

– डॉ. सलील कुलकर्णी, ‘स्वच्छता ब्रँड अॅम्बॅसिडर’

अॅप नेमके कशासाठी?

– अॅपचा वापर करून नजिकचे स्वच्छतागृह शोधण्याबरोबरच वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायझर, कचराकुंडी, लाइट, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स आदी सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे पाहायला मिळते.

– अॅपवर स्वच्छतागृहांतील सुविधांबाबत, स्वच्छतेबाबत फीडबॅक आणि तक्रार करण्याची; तसेच गुणांकन देण्याचीही सुविधा आहे.

– सध्या दहा हजारांहून अधिक नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.

– नोव्हेंबरमध्ये सर्व स्वच्छतागृहांत ‘क्यू आर’ कोड लावण्यात आले. त्याआधारे आतापर्यंत १०० अभिप्राय पालिकेला प्राप्त झाले आहेत.

– स्वच्छतागृहांबाबत तक्रार आल्यास ती प्राधान्याने सोडविली जाईल, असे डॉ. कुनाल खेमनार यांनी सांगितले.

पहिल्या तीन स्वच्छतागृहांना बक्षिसे

एक जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत शहरात स्वच्छ स्वच्छतागृह स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील उत्कृष्ट पाच स्वच्छतागृहांची शहर पातळीवर निवड होणार आहे. त्यातील तीन उत्कृष्ट स्वच्छतागृहांना बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘टॉयलेट सेवा अॅप’द्वारे मिळणाऱ्या गुणांकनाला ३० गुण, अॅपद्वारे सर्वाधिक वापरासाठी ३० गुण आणि प्रत्यक्ष पाहणीला ४० गुण असे मूल्यांकन केले जाणार आहे.

परीक्षण समितीत पत्रकारही

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एक अशा १५ आणि केंद्रीय स्तरावरील एक अशा समित्या परीक्षण करतील. यात महापालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकारांचा समावेश असेल.

तुम्ही धंदा करायला बसलाय का? निधीचे वाटप न झाल्याने भुसेंची नाराजी, पीकविमा कंपन्यांना डोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed