• Sat. Sep 21st, 2024

‘सत्र न्यायालयातील काही न्यायालये माझगावमध्ये नको’, वकिलांचा तीव्र विरोध; संघटनेचा ठराव; दोन दिवस साखळी उपोषण

‘सत्र न्यायालयातील काही न्यायालये माझगावमध्ये नको’, वकिलांचा तीव्र विरोध; संघटनेचा ठराव; दोन दिवस साखळी उपोषण

मुंबई: फोर्ट परिसरातील मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालय इमारतीतील काही न्यायालये ही माझगावमधील नव्या न्यायालय इमारतीत हलवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याचे समजल्याने दिवाणी व सत्र न्यायालयातील वकिलांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘फोर्टमधील सत्र न्यायालयाची विभागणी करून या न्यायालयातील काही न्यायालये माझगावमध्ये हलवल्यास किंवा कोणतेही न्यायालय हलवल्यास पक्षकार व वकिलांची प्रचंड गैरसोय होईल. त्यामुळे तसे करण्यात येऊ नये’, असा ठराव ‘बॉम्बे सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट बार असोसिएशन’ने बुधवारी केला.

‘मुंबईतील मुख्य दिवाणी व सत्र न्यायालय हे फोर्टमधील सत्र न्यायालय इमारतीत आहे. या इमारतीत दिवाणी व सत्र न्यायालयाची अनेक न्यायालये कार्यरत आहेत. त्यापैकी काही न्यायालये माझगावमधील नव्या न्यायालय इमारतीत हलवण्यात येणार असल्याचे आम्हाला कर्मचारी वर्गाकडून कळले. त्यादृष्टीने फायली, दस्तवेजही बॅगांमध्ये भरले जात असल्याचे कानावर आले. फोर्टमधील या न्यायालयाची विभागणी करण्यास पक्षकार व वकिलांची प्रचंड गैरसोय असल्याने यापूर्वीही १५ जून २०२२ रोजी आमच्या संघटनेने विरोध करणारा ठराव एकमताने केला होता. तसेच वकिलांना विश्वासात घेतल्याविना व चर्चा केल्याविना अशाप्रकारे निर्णय घेण्यात येऊ नये, असे निवेदनही आम्ही दिवाणी व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना तसेच मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाला दिले होते. तरीही न्यायालयाची विभागणी करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आमचा याला तीव्र विरोध आहे’, असे संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी बुधवारी सत्र न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच ‘आमच्या विरोधाला व मागण्यांना दाद दिली जात नसल्याने गुरुवार, २१ डिसेंबर आणि शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी आम्ही संघटनेचे पदाधिकारी व वकील न्यायालय परिसरात साखळी उपोषणाला बसणार आहोत’, असेही जाधव यांनी जाहीर केले.

रमेश खोकराळे यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed