डोंबिवलीमधील एका कार्यक्रमानंतर खा.शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नाव न विरोधकांना टोला लगावला. शिंदे यांनी सांगितले की आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही. तर दिवसरात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत, कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. दुसरे कोण विरोधक कामे सांगू शकतात का? मी अमुक काम केले, तमुक काम केली, एवढी हिम्मत आहे का? विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही आणि माझी ती सवय नाही,असा शिंदे यांनी टोलाही हाणला.
यालाच मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसे स्टाईल आणि ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे. मनसे आमदार पाटील यांनी एका वृत्तवहिनीशी बोलताना नाव न घेता शिंदे यांना टोला हाणत सांगितले की, सगळी कामे तेच करत आहे. आम्ही गोट्या खेळत असतो, सगळी कामे तेच करतायत, वडिलांच्या खात्यातून पैसे आणून हुशाऱ्या करण्यापेक्षा तिथे लोकांच्या हिताची कामे दाखवा. कालच एमआयडीसी निवासी विभागात नागरिक रस्त्यावर उतरले होते. कारण जी रस्त्याची कामे करायला पाहिजे ती केली केली नाहीत. काही रस्त्याची कामे केली ती बरोबर आहेत. परंतु फक्त रस्त्याची काम आणायची त्यातून पॉकेट मनीसाठी पैसे काढायचे.याला जर विकास बोलत असतील तर त्यांना लखलाभ त्यांनी आमचा पलावा पूल,दिव्याचा पुल करावा मानकोली पुलाची अलायमेंट चेंज झाली आहे ती करावी, असे आमदार पाटील यांनी सांगितले.