• Sat. Sep 21st, 2024
दोन वर्षापासून फरार होता, रिवॉल्वर घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि तिथेच गेम झाला…!

यवतमाळ : डॉ. धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला एलसीबी पथकाने रिव्हॉल्व्हरसह अटक केली. ही कारवाई उमरखेड-हदगाव मार्गावर सोमवार, १८ डिसेंबरला करण्यात आली. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अमजद खान सरदार खान रा. वसंतनगर, पुसद असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

उमरखेड येथील शासकीय कुटीर रुग्णालयात डॉ. हनमंत धर्मकारे कार्यरत होते. गेल्या दोन वर्षापूर्वी दि. ११ जानेवारी २०२२ रोजी दुपारच्या सुमारास डॉ. धर्मकारे हे पुसद मार्गावरील गोरखनाथ हॉटेलसमोर दुचाकीवर बसून होते. यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करीत निर्घृण हत्या केली. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये मारेकऱ्यांवर गुन्हे नोंद केले होते. दरम्यान एलसीबी पथकाने यातील काही मारेकऱ्यांना अटकही केली होती. मात्र गुन्ह्यातील अमजद खान हा घटनातारखेपासूनच फरार झाला होता.

त्यानंतर सुध्दा त्याने सन २०२३ मध्ये पुसद शहरात एक प्राणघातक हल्ला केला होता.त्या गुन्ह्यातही तो फरार होता. याबाबतचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. बन्सोड यांनी सराईत गुन्हेगार अमजद याला अटक करण्याचे निर्देश एलसीबीला दिले होते. अशात अमजद खान सरदार खान हा उमरखेड शहरात आला असून त्याच्याजवळ रिवॉल्वर असल्याची माहिती एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली.

दरम्यान पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने उमरखेड गाठून अमजद याची शोधमोहीम राबविली. यावेळी तो उमरखेड ते हातगाव मार्गावरील एका पेट्रोलपंपाजवळ आढळून आला. दरम्यान त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक रिवॉल्वर आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, पोलिस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, आकाश सहारे, योगेश टेकाम यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed