• Sun. Sep 22nd, 2024
‘हा पोरगा पुढे गाजवणार’; शेतकऱ्याच्या पोरानं गाजवलं सवाई, बापाचे अश्रू खूप काही सांगून गेले…

पुणे : गाण्याच्या साधनेसाठी आणि मुलासोबत कायम राहता यावे म्हणून वडिलांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून त्याला संगीताची तालीम देऊन सावलीसारखे ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. शुक्रवारी जेव्हा तो सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गायला आणि रसिकांनी त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेतले; तेव्हा त्या पित्याच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगून गेले. ही गोष्ट आहे, बेळगाव जिल्ह्यातल्या चंनम्मा-कित्तूर गावचा तरुण शास्त्रीय गायक रजत कुलकर्णी आणि त्याचे वडील राजेश कुलकर्णी यांची. रजतच्या गायनाने शुक्रवारी गाणे रक्तात नाही, तर मनात असावे लागते, याचा अनुभव रसिकांना दिला.

किराणा घराण्याची परंपरा चालवणाऱ्या आश्वासक गायकांच्या यादीत शुक्रवारी रजत कुलकर्णीच्या नावाचाही समावेश झाला. ‘हा पोरगा पुढे गाजवणार’ अशाच भावना अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. रजत लहानपणी कन्नड भक्ती संगीत गुणगुणायला लागला. त्याच्या आईने ही गोडी त्याला लावली. त्याची ही चुणूक बघून वडील राजेश कुलकर्णी यांनी रजतला संगीत शिकवण्याचा निर्णय घेतला. रजतचे आजोबा कन्नड दास साहित्यातील रचना लिहायचे आणि गायचे सुद्धा. तोच वारसा पुढे चालवावा म्हणून राजेश कुलकर्णी यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आपला उर्वरित वेळ रजतच्या संगीत शिक्षणासाठी दिला. रजत प्रारंभी एस. एस. हिरेमठ यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेत होता. आता तो गेल्या काही वर्षांपासून पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचे गायक पं. अनंत तेरदाळ यांच्याकडे तालीम घेतो आहे. सध्या तो संगीतात बी. ए.चे शिक्षण पूर्ण करीत असून, एम. ए. करून शास्त्रीय संगीतातच करिअर करण्याचा त्याचा मानस आहे.

Uddhav Thackeray : राज्यातील सरकार अदानींच्या दारी, करोनाशी लढलेली धारावी झुकणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शुक्रवारी एकप्रकारे पं. तेरदाळ यांच्या गुरूंनी सुरू केलेल्या महोत्सवात त्याने पहिल्यांदा सादरीकरण केले आणि एक वर्तुळ पूर्णत्वाकडे गेल्याचे जाणवले. पुण्यात पहिल्यांदाच आणि तेही सवाईत, हजारो रसिकांसमोर त्याने आपली कला सादर करीत ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आपलेसे केले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्याचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया महोत्सवाचे निवेदक आनंद देशमुख यांच्यापर्यंत पोहोचवल्या. यातूनच त्याला त्याच्या सादरीकरणाची पावती मिळाली. महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास जोशी यांनीही बेळगाव भेटीच्या आठवणी सांगत त्याची कला यापूर्वीच हेरली होती, असे सांगितले. शुक्रवारी दुपारी झालेल्या या आश्वासक गायकाच्या सादरीकरणाने सवाई फक्त दिग्गज कलाकारांचे व्यासपीठ नसून, आता ते अभिजात संगीताचे भविष्य घडवणारे व्यासपीठही आहे, यावर शिक्कामोर्तब झाले.

…आणि दोन मित्रांची भेट झाली

गेल्या वर्षी महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास जोशी यांचा पुत्र विराज जोशी याने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सादरीकरण केले. विराज आणि रजत हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांच्या वयात एक-दोन वर्षांचे अंतर. शुक्रवारी सादरीकरणानंतर व्यासपीठामागे दोघेही एकमेकांना भेटले आणि विराजने मिठी मारून रजतचे कौतुक केले. लहानपणीच दोघांच्या संगीताचा सुरू झालेला प्रवास कधी तरी नक्की एकत्र एका मंचावर येईल, अशी आशा व्यक्त करीत आम्हाला एकत्र गायला नक्की आवडेल, असेही सांगितले.

देवाचरणी माझी सेवा

‘माझे गुरू पं. अनंत तेरदाळ हे पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य होते. यामुळे आज गुरूंच्या गुरूंनी स्थापलेल्या या मंचावर सादरीकरण करायला मिळाले, ही एकप्रकारे देवाच्या चरणी केलेली सेवा आहे. मी आज जे काही आहे ते माझ्या आई-वडिलांमुळे आहे. त्यांनी आयुष्यात स्वतः कष्ट करून माझा संगीतप्रवास सुरू ठेवला. ही गोष्ट आजन्म विसरणार नाही,’ अशा भावना रजतने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केल्या.

रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सने केला मोठा गेम, हिटमॅनला कसं अडकवून ठेवलं जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed